सिद्धेश आचरेकर ल्ल मालवणहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी सागरी राजधानी म्हणून बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा पश्चिमेकडील भाग अजस्र लाटांच्या तडाख्याने कमकुवत बनला होता. काही ठिकाणी ढासळलेल्या बुरुज व तटबंदीचे काम ‘पुरातत्त्व’ विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडून तटबंदीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शिवकालीन किल्ल्याच्या बांधकामाच्या धर्तीवर सुबक पद्धतीने कोरीव काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यात तटबंदीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पुरातत्त्व विभागाचे कार्यदर्शक अधिकारी राजेश दिवेकर यांनी व्यक्त केला.शिवाजी महाराजांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेला किल्ले सिंधुदुर्ग देशी-विदेशी लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पंक्तीत असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही पडझडीचे ग्रहण लागले होते. गड-किल्ले संवर्धनाबाबत शासनाच्या ढीम्म आणि उदासीन धोरणामुळे गड-किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गचे तीन बुरुज व दोन तटबंदी ढासळल्याने चार वर्षांपूर्वी १२ व्या वित्त आयोगातून ३.१९ लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर झाला होता. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत समुद्रात गेली ३५० वर्षे दिमाखदार रूपात किल्ले सिंधुदुर्ग उभा आहे. किल्ले सिंधुदुर्गचा अधिक करून पश्चिम दिशेने येणाऱ्या लाटांमुळे पश्चिमेकडील तट कमकुवत होऊन तो ढासळत चालला होता. यात तटबंदीच्या भिंती कोसळल्याने तटाचे दगड पश्चिम बाजूकडील समुद्रात फेकले गेले. त्यामुळे किल्ल्याच्या शिवकालीन दगडांचा क्रेनच्या सहाय्याने वापर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील १२ मीटर तटबंदीचे काम हाती घेण्यात आले असून सुमारे ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.नैसर्गिक सौंदर्य जिवंत ठेवणार : राजेश दिवेकरगडकिल्ल्यांच्या यादीतील किल्ले सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला लाखो शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहे. गेल्या काही वर्षात लाटांच्या माऱ्यात ढासळलेले बुरुज व तटबंदीचे काम हाती घेताना पुरातत्त्व विभागाकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या. महाराजांचा ऐतिहासिक वारसा असल्याने बांधकाम धीम्यागतीने पण शिवकालीनपणा जिवंत ठेवून करण्यात आले. किल्ल्यातील दगड व वाळू उत्खनन अल्प प्रमाणात झाले असून किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य जिवंत ठेवण्यासाठी वापर झाला आहे. येत्या दोन महिन्यात १२ मीटरची तटबंदी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, असे राजेश दिवेकर यांनी सांगितले.तटबंदीचे काम शिवकालीन, कर्नाटकमधील ३४ कारागिरांचा समावेशपुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या तटबंदी व बुरुजांचे बांधकाम शिवकालीन धर्तीवर करण्यात येत आहे. यासाठी स्थापत्य अभियंता व किल्लेदार हरीश गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक येथील ३४ कुशल कामगार मेहनतीने काम करत आहेत. यासाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध झाली आहे. यात वीस डंपर दगड, दोन ट्रक विटा, एक ट्रक चुना व अन्य साहित्य बांधकामासाठी उपलब्ध झाले आहे. किल्ल्यात उपलब्ध असलेले नैसर्गिक दगड व अत्यल्प प्रमाणात वाळू बांधकामासाठी वापरली जात आहे. नैसर्गिक दगड वापरण्यात येत असल्याने किल्ल्याच्या सौंदर्याला अधिक झळाळी येणार आहे, असेही पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. यापूर्वी तीन बुरुजांचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पश्चिम तटबंदीचे काम शिल्लक राहिले असून गेल्या महिन्यापासून काम हाती घेण्यात आले आहे. तटबंदी बांधताना झाराप येथील दगड वापरले जात असून किल्ल्यातील नैसर्गिक दगडांचा वापर केला जात आहे. क्रेन व ३४ कामगारांच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक काम युद्धपातळीवर सुरू आहे. तटबंदी उभी राहत असताना तिला शिवकालीन टच देण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे. १२ मीटरच्या शेवटच्या तटबंदीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण करण्यात येईल.
‘किल्ले सिंधुदुर्ग’ अजस्र लाटा झेलण्यास पुन्हा सज्ज
By admin | Published: January 11, 2017 11:52 PM