दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - परमे येथे तीन जणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (14 फेब्रुवारी) पहाटे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये वयोवृद्ध व्यक्तीसह माय-लेकाचाही समावेश आहे. नारायण धुरी(वय 75 वर्ष), लक्ष्मी जाधव (वय 55 वर्ष) आणि परशुराम जाधव (वय 24 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बांबुळी गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तीन जणांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या गावातीलच सुधाकर नाईक यांच्या घरात शिरला. बिथरलेल्या बिबट्याने त्यांच्या घरातील बऱ्याच वस्तूंचे नुकसान केले. पण, पिंजरा लावून बिबट्याला बाहेर काढताना वनविभाग कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखतच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांनी दिली.
दरम्यान, यावेळेस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बिबट्याने नासधूस केलेल्या घराचा पंचनामा न करता वनविभागाचे पथक बिबट्याला घेऊन निघाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल अशोक गमरे आणि त्यांच्या पथकाला घेराव घातला. जोपर्यंत नुकसानीचा पंचनामा केला जात नाही तोपर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गावातून जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी ग्रामस्थ आणि वन अधिकार्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. गमरेंनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे मान्य केल्यावर ग्रामस्थ शांत झाले.
पहाटेच्या सुमारास बिबट्याचा हल्लागुरुवारी (14 फेब्रुवारी) भल्या पहाटे बिबट्याचा थरार परमे वासियांनी अनुभवला. बिबट्याने भर वस्तीत प्रवेश करत शेत मांगरात झोपलेल्या नारायण धुरी यांना गंभीर जखमी केले. यानंतर बिबट्याने जाधव वाडीतील माय लेकावर हल्ला चढवला.