सिंधुदुर्गनगरी : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघासाठी २१ मे रोजी निवडणूक होत असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी सोमवारी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे.जिल्ह्यात २१२ मतदार निश्चित झाले असून कणकवली, कुडाळ व सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांचा कक्ष जिल्ह्यातील तीन मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.या मतदार यादीत फक्त कणकवली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांना स्थान मिळालेले नाही. मतदार यादी निश्चित झाल्यानंतर येथील स्वीकृत नगरसेवक जाहीर झाल्याने त्यांना या मतदानाला मुकावे लागणार आहे.२१ मे रोजी ही निवडणूक होत असून २४ मे रोजी रत्नागिरी येथे मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे त्या-त्या जिल्ह्यात काम पाहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रांची मतदार केंद्रे सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगर पंचायती, नगर परिषद, पंचायत समिती व तहसीलदार यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदार केंद्रांसाठी निरीक्षक म्हणून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अव्वर सचिव संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला आहे. कोणतीही समस्या असल्यास ७०६६७५४८७४ या भ्रमणध्वनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निश्चित केलेल्या मतदार यादीनुसार ५० जिल्हा परिषद सदस्य, आठ पंचायत समित्यांचे सभापती, जिल्ह्यातील आठही नगर पालिका व नगर परिषद यांच्या नगराध्यक्षांसह लोकनियुक्त नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक मिळून १५४ मतदार आहेत.
मतदार यादी निश्चित करण्यापूर्वी कणकवली नगर परिषदेच्या स्वीकृत नगर सेवकांची निवडणूक प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे या नगर परिषदेच्या स्वीकृत नगर सेवकांना मतदार यादीत स्थान मिळाले नसून या दोन स्वीकृत नगरसेवकांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.