सिंधुदुर्गनगरी : पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला सोमवारपासून सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी बँडमन या पदासाठी एकूण १२२५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४५८ उमेदवार उपस्थित राहिले.
या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली असता यातील ३० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत ७६७ उमेदवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना महाआॅनलाईनकडून हॉल तिकीट न मिळाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली.दरम्यान, या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉल तिकीटअभावी गैरसोय झालेल्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसून अर्ज वैध असलेल्या सर्व उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. रिक्त असणाऱ्या ७१ जागांसाठी १० हजार १७६ उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. सोमवारी पहाटे बँडमन पदासाठी मैदानी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२२५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यात ११३२ पुरूष तर ९३ महिला उमेदवारांचा समावेश होता. यापैकी प्रत्यक्ष हॉल तिकीट (प्रवेशपत्र) असणाऱ्यां ४५८ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.यावेळी हॉल तिकीट नसणाऱ्या उमेदवारांची मात्र तारांबळ उडाली. या उमेदवारांनी समन्वय अधिकारी शहा यांच्याकडे धाव घेत आपले म्हणणे मांडले. मात्र पहिल्या दिवशीतरी या उमेदवारांची प्रवेश पत्राऐवजी मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली नव्हती. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मार्ग काढला असून अशा उमेदवारांना १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता मुख्यालय मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
उमेदवारांना मोफत अल्पोपहाराची सोयजिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशानुसार उपस्थित सर्व उमेदवारांना मोफत अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर ओरोस फाट्यापासून पोलीस भरती ठिकाणापर्यंत उमेदवारांना ने- आण करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.पहिल्या दिवशी २८ पुरूष, २ महिला अपात्रमैदानी परीक्षा घेण्यात आलेल्या ४५८ उमेदवारांपैकी ३० उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले आहेत. यात २८ पुरूष उमेदवार हे छाती व उंचीमुळे व दोन महिला उमेदवारांना उंचीमुळे अपात्र ठरविण्यात आले. ही परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहणार आहे.भरती प्रक्रिया पारदर्शकपोलीस भरती दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरती दरम्यान ड्रोन कॅमेरा व सीसीटीव्ही कॅमेरे यांचा वापर करण्यात येत आहे. मंत्रालयातील काही कर्मचारी या पोलीस भरतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू आहे.
सोमवारपासून येथील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान मैदानी चाचणी घेताना पोलीस कर्मचारी तर बाजूला एक पोलीस कर्मचारी हा क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे.
महाआॅनलाईन कडून शेकडो उमेदवारांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) न आल्याने या उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणी परीक्षेला मुकावे लागले होते. ज्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत अशांनी आवेदन अर्जासहीत १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता ओरोस पोलीस मुख्यालय मैदानावर उपस्थित रहावे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त नाही अशा उमेदवारांची सत्यता पडताळून निर्णय दिला जाणार आहे- दीक्षितकुमार गेडाम,पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग