सिंधुदुर्गनगरी : येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण १५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यात ९३२ उमेदवार हजर राहिले तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले.
शारीरिक चाचणीत ७० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. मैदानी चाचणीसाठी ८६२ उमेदवार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत बोलाविण्यात आलेल्या ६७२५ उमेदवारांपैकी ३८७७ उमेदवार पात्र ठरले असून शारीरिक चाचणीत ३०१ उमेदवार बाद झाले आहेत. जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून हजारो उमेदवार सिंधुदुर्गनगरीत दाखल झाले आहेत. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या राबविली जात आहे.सोमवार १२ मार्चपासून सुरू झालेल्या या भरतीला आतापर्यंत (१२ ते १४ मार्चपर्यंत) ६७२५ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४१७८ उमेदवार हजर राहिले तर २५४७ गैरहजर राहिले. हजर असलेल्या ४१७८ उमेदवारांपैकी ३८७७ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले आहेत. तर ३०१ अपात्र ठरले आहेत.बुधवारी सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ९३२ उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले. यात ८६२ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र तर ७० उमेदवारांना शारीरिक चाचणीत अपात्र ठरविण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून भरती ठिकाणच्या प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचारी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून मैदानी चाचणीसाठी पुढे पाठवित आहेत. पुल अप्स, १०० व १६०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक हे मैदानी प्रकार घेतले जात आहेत.
पोलीस भरती प्रक्रिया काटेकोरपणे
पोलीस भरती प्रक्रिया अगदी काटेकोरपणे पार पाडण्यात येत असून पोलीस अधीक्षक गेडाम स्वत: लक्ष देत आहेत.