सिद्धेश आचरेकरमालवण : गणेश चतुर्थी म्हणजे सिंधुदुर्गवासीयांचा सर्वात जवळचा मोठा सण. गणेशोत्सव व भजन हे भक्तांचे समीकरण बनल्याने गणेशोत्सवात जिल्ह्यात सर्वत्र भजनी बुवा आणि मंडळांत गणेशोत्सवात भजनाची सांगड घालून गणरायाचे नामस्मरण करणे ही कोकणची जणू परंपरा बनली आहे. अलीकडील काही वर्षांत भजनांचा ट्रेंड बदलला असून हिंदी-मराठी चित्रपटांच्या गाण्यांच्या चालींवर रचलेल्या गौळणी आणि गजर गणेशभक्तांच्या पसंतीस उतरतात.गणेश चतुर्थीत भजन कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भजनाच्या माध्यमातून बाप्पाची सेवा करण्यासाठी भजनी मंडळांची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन मंडळे दरवर्षी दोन-तीन वेगळी भजने बसविण्याची तयारी गणेशोत्सवाच्या अगोदरपासूनच करतात. यात तरुण आणि युवा पिढीचाही चांगला सहभाग आहे.गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून भजनांना सुरुवात झाली आहे. काही भजन मंडळे अशीही आहेत की, त्यांना गणेशोत्सवाचे ११ दिवस पुरेशी झोपही मिळत नाही. गावोगावी रात्र जागवून भजने केली जातात. अगदी पहाटेपर्यंत चाललेल्या या भजनात कोणीही झोपण्याचे नावही काढत नाही. मग तो सरकारी नोकर असो किंवा मोलमजुरी करणारा शेतकरी असो. भजनी बुवांनाही गणेशोत्सवात मोठी मागणी असते. अशावेळी नियोजित वेळापत्रकांत बदल करून गणरायाच्या सेवेसाठी बुवांना जावे लागते.भजन क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलावर्गानेही कात टाकली आहे. डबलबारीच्या माध्यमातून अनेक महिला बुवांनी भजन क्षेत्रात नाव कमावले आहे. आतातर काही गावात महिला भजन मंडळे स्थापन झाली असून पुरुषांच्या तोडीस तोड भजनाचे सादरीकरण करत आहेत. मालवण तालुक्यात दहा ते पंधरा महिला भजन मंडळे गणेशोत्सवात भजन सादर करत आहेत. भजन मंडळातून देवाची भजनरुपी सेवा होतेच शिवाय त्यातून अनेक बुवा, पखवाजवादक असे कलाकार घडतात.मुखी आरती, गातात बाप्पाची कीर्तीगणेशोत्सव म्हटला की घराघरात आरतीचे स्वर कानी पडू लागतात. गणपतीची पूजाअर्चा झाल्यानंतर आरतीला मानाचे स्थान आहे. भजनातही अनेक ठिकाणी आरती गाऊन भजनाची सांगता केली जाते. घराघरात गणपतीच्या आरतीसोबतच शंकराची आरती, देवी, विठ्ठल, कृष्ण, दत्त, सत्यनारायणाची आरती आदी सर्व प्रकारच्या आरत्या आळविल्या जातात. त्यासाठी पखवाज, मृदुंग, ढोलक, टाळ, झांज, चकवा आदी साहित्याचा वापर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले जाते.भजनाचा ट्रेंडप्रत्येक क्षेत्रात बदल घडतात तसेच भजनातही बदल घडत आहेत. आपल्या घरात गणपती विराजमान असताना भजन हे ठेवले जाते. भजन संपल्यानंतर भजन मंडळाला आपल्या मनानुसार काही रक्कम द्यावी लागते. मात्र काही जणांना ते शक्य नसते. त्यांच्यासाठी बाजारपेठेत भजनी बुवांच्या नवनवीन कॅसेट उपलब्ध असतात. नावीन्यपूर्ण गाण्यावर सादर केलेली भजने आताच्या जमान्यात नवा ट्रेंड बनत आहे.
Ganesh Chaturthi 2018 : सिंधुदुर्ग :आरती, भजनातून बाप्पाच्या सेवेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:18 PM
गणेश चतुर्थी म्हणजे सिंधुदुर्गवासीयांचा सर्वात जवळचा मोठा सण. गणेशोत्सव व भजन हे भक्तांचे समीकरण बनल्याने गणेशोत्सवात जिल्ह्यात सर्वत्र भजनी बुवा आणि मंडळांत गणेशोत्सवात भजनाची सांगड घालून गणरायाचे नामस्मरण करणे ही कोकणची जणू परंपरा बनली आहे.
ठळक मुद्देआरती, भजनातून बाप्पाच्या सेवेची परंपराघरोघरी गणरायासह देवांच्या आरत्या