बांदा : कर्ज वसुलीसाठी दुकानात गेलेल्या बँक आॅफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरडे यांनी तेथील महिलेशी असभ्य वर्तन केल्याने बांदा ग्रामस्थांनी घरडे यांच्यावर कारवाईसाठी बांदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
दुपारी ३ वाजता हा प्रकार घडला. सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. दरम्यान, कुडाळ येथील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत या प्रकाराबाबत माफी मागून घरडे यांची तत्काळ बदली करण्याचे मान्य केल्यानंतर या प्रकरणावर तडजोडीने पडदा टाकण्यात आला.बँक आॅफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक घरडे एका कर्मचाऱ्यासहीत दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील एका दुकानात कर्ज वसुलीसाठी गेले होते. यावेळी दुकानात असलेल्या महिलेसोबत त्यांनी असभ्य भाषेत वर्तन केले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी पाहिला. त्यानंतर बांदा सरपंच मंदार कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कानावर हा प्रकार ग्रामस्थांनी घातला.
संतप्त झालेल्या सरपंच व सदस्यांनी जाब विचारण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन घरडे यांना गाठले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्याला या प्रकाराबाबत विचारले असता त्याने घरडे यांनी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचे सांगितले. त्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक झाले.हळूहळू याबाबतची बातमी संपूर्ण शहरात पसरताच संतप्त ग्रामस्थांनी बँकेच्या शाखेकडे मोठी गर्दी केली. घरडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर बांदा पोलीस ठाण्याचे जयदीप कळेकर घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ बँकेच्या वरिष्ठांना बोलवा, अन्यथा तुम्हांला येथून जाऊ देणार नाही, असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले.दरम्यान, कुडाळ येथील बँकेचे वरिष्ठ अधिकारी बांद्यात हजर झाल्यानंतर हा प्रकार पोलीस ठाण्यात नेण्यात आला.दरम्यान, त्या महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, हा प्रकार अधिकच चिघळल्याने अखेर वरिष्ठांनी माफी मागत घरडे यांची बदली करण्याचे मान्य केले. शिवाय असे प्रकार पुन्हा होणार नसल्याचे सांगितल्यानंतर हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. या घटनेने बांदावासीयांची एकजूट पहायला मिळाली.कर्मचारी त्रस्तबांदा शाखेत घरडे दाखल झाल्यापासून शाखेतही त्यांनी आपली दहशत ठेवली होती. कर्मचाऱ्यांना त्रास देणे, त्यांच्या तक्रारी करणे आदी प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त होते. ठेवीदारांबाबतही घरडे यांचा हाच स्वभाव असल्याने काहींनी आपली खाती बंद केली होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.