कुडाळ : गोवा येथील संशयित चंदन तस्कर सुदिशकुमार याला वनविभागाच्या पथकाने आंध्रप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. चंदन तस्करी व विक्री प्रकरणी वनविभागाला मिळालेले हे सर्वात मोठे यश असून, या चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील शासकीय वनांमधील चंदनाची झाडे अनधिकृतपणे तोडून त्यांची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ले-कॅम्प येथील अजित गावडे याच्यासह तेथीलच मयूर आंगचेकर, गणेश गिरी, कातकरी समाजातील सुरेश पवार, चंदू पवार, शिवाजी पवार, राजू पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून वनविभागाने त्यांना अटक केली होती.
न्यायालयाने या सर्वांना वन कोठडी सुनावली होती. अधिक तपास करताना या प्रकरणाचे धागेदोरे गोवा-काणकोण येथील बंद असलेल्या गोवा परफ्युुमस कंपनीपर्यंत पोहोचले होते. तेथील चौकीदार तसेच अन्य एकाला अटक करण्यात आली होती. मात्र, कंपनीचा मॅनेजर सुदिशकुमार हा फरार होता. त्याचा तपास वनविभागाचे पथक करीत होते.यादरम्यान सुदिशकुमारचे मोबाईल लोकेशन आंध्रप्रदेश येथे सापडले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक व उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ आॅगस्ट रोजी सहाय्यक वनसरंक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांच्यासमवेत कडावल वनक्षेत्रपाल, कुडाळ वनक्षेत्रपाल, निवडक वनकर्मचाऱ्यांसह पोलिसांचे पथक सुदिशकुमारचा शोध घेण्यासाठी कर्नाटक व आंध्रप्रदेशला रवाना झाले होते.
त्यानंतर आंध्रप्रदेश-अगाली येथून त्याला ताब्यात घेतले. कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल प्रदीप कोकितकर, कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे, मठ वनरक्षक विष्णू नरळे, वाडोस वनरक्षक प्रियांका पाटील, जयश्री शेलार यांनी पोलीस पथकाच्या सहाय्याने पार पाडली.३ सप्टेंबरपर्यंत वनकोठडीगोवा येथील संशयित चंदन तस्कर सुदिशकुमार याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेत सोमवारी वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.