सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री सावंतवाडी मळगाव पुल ते पिंगुळी तिठा असा थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार ८४० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाखाची स्विफ्ट कार असा सुमारे ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी कार चालक संशयित सहदेव शशिकांत सातार्डेकर (३६) रा. तेंडोली याला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री व वाहतूकिवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध दारू वाहतूकिवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला शुक्रवार दि ४ जानेवारी रोजी रात्री मुंबई गोवा महामार्गावरुन गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार एलसीबीने एक पथक तयार करून ह्या पथकामार्फत मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी मळगाव येथे गस्त घालत असताना गोव्याच्या दिशेने येणा?्या स्विफ्ट कार (एमएच ४३ व्ही २२६७) या कारला एलसीबीच्या पथकाने थांबण्याच्या ईशारा केला. मात्र कार चालकाने कार न थांबविता सुसाट पुढे घेवून गेला.
यावर एलसीबीच्या पथकाने महामार्गावर थरारक पाठलाग करत कुडाळ तालुक्यातील पिंगुळी तिठा येथे स्विफ्ट कार थांबून तपासणी केली असता कार मध्ये २ लाख ६७ हजार ८४० किमतीची गोवा बनावटीची दारू आढळुन आली.
त्यामुळे गोवा बनावटीची दारू व दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर विनापरवाना अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, अनूप खंडे, रवि इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, अमित तेली या पथकाने ही कारवाई केली.