कणकवली : प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यपरिवहन महामंडळ नेहमीच तत्पर असते. गणेशोत्सवाच्या यशस्वी नियोजनानंतर दिवाळीसाठीही जादा गाड़यांची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकरी तसेच भाविकांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती एस टीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यानी दिली.प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळावी यासाठी राज्य परिवहन महामंडळ विशेष प्रयत्न करीत असते. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद एस टी ला मिळत असतो. गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. तसेच परतीच्या प्रवासासाठीही गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला.आता दिवाळीसाठी जादा गाड़यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुर येथे विठ्ठल दर्शनासाठी वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने जात असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एस टी कडून नियोजन करण्यात येत आहे.सिंधुदूर्गातील विविध भागातून पंढरपुर येथे जाण्यासाठी भाविकानी मागणी केल्यास गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी भाविकानी एस टी आगार प्रमुखांशी संपर्क साधल्यास नियोजन करणे सोपे जाईल. प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल.असेही प्रकाश रसाळ यांनी सांगितले.
एस टी च्या सेवेचा लाभ घ्या !
दीवाळी निमित्त शाळा , महाविद्यालये तसेच विविध आस्थापने यांना सुट्टी असते. या कालावधीत बाहेर गावी जाण्याचे नियोजन अनेक व्यक्तींकडून केले जाते. या सर्व व्यक्तिनी सुरक्षित प्रवासासाठी एस टी च्या सेवेचा लाभ घ्यावा.
प्रकाश रसाळ,सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक