सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील अॅडव्हेंचर ग्रुपने डॉन बॉस्को स्कूल आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या साहसी क्रीडा प्रकारांच्या शिबिरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांसह ओरोस बालसुधारगृहातील मुलांनीही सहभाग घेतला.व्हॅली क्रॉसिंग, झिपलिंग, रोप बॅलन्सिंग, पॅरलल रोप, एअर रायफल शुटींग असे गिर्यारोहणातील अनेक साहसी क्रीडा प्रकार सहभागी विद्यार्थ्यांना या शिबिरात अनुभवता आले. रानबांबुळी प्राथमिक शाळा, सुकळवाड प्राथमिक शाळा आणि ओरोस बालसुधारगृहाचे ओरोस हायस्कूलमधील विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना साहसी क्रीडा प्रकारांची ओळख व्हावी, त्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्यात साहस, आत्मविश्वास, समयसूचकता, संघभावना, निसर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी या गुणांची वाढ व्हावी तसेच गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती मिळावी यासाठी सिंधुुदुर्गनगरी येथे हे शिबिर झाले.
या शिबिराचे नेतृत्व आणि आयोजन अॅडव्हेंचरचे मिलिंद भारती, रचना देसाई आणि महेश देसाई यांनी केले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉन बॉस्को स्कूल ओरोसचे प्रशासक फादर जोकिम आणि मुख्याध्यापक फादर क्लाईव्ह तसेच शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्यांना शिबिरात संधीसिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेता आला. आर्थिक कारणांमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या संधी हिरावल्या जाऊ नयेत यासाठीचा हा प्रयत्न होता आणि तो सिंधुदुर्गवासीयांच्या सहकार्याने यशस्वी झाला. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.