सावंतवाडी : नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.ओरोस कृषीभवन येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार अडसूळ यांनी येथील आरपीडी हायस्कूलला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुुख बाळा परब, शहरप्रमुख शब्बीर मणियार, दिनेश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अडसूळ पुढे म्हणाले, नोटा बंदीमुळे आज राज्यातील एकूण जिल्हा बँकेतील ३३ बँकातील ५ हजार ८०० कोटी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय सरकारने कर्जमाफी केली. याचे पैसेही जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, तेही पैसे नोटाबंदीमुळे सद्यस्थितीत अडकून पडले आहेत.
आपण पंतप्रधानांचे याबाबत लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही. जीएसटीचा निर्णय हा जरी चांगला असला तरी घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून सर्वसामान्य व्यापाराला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान येणाऱ्या बॅजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्षांनी घेतली सदिच्छा भेटखासदार अडसूळ हे सावंतवाडीत आल्याचे समजताच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची आरपीडी कॉलेजमध्ये जाऊन भेट घेत नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली.