देवगड : देवगडचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या हरितक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसायमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मे महिन्यात या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.आनंदवाडी प्रकल्पाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली असून या प्रकल्पाला केंद्रशासनाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. केंद्रशासनाच्या सागरमाला योजनेतून २५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून मार्च अखेरीस सदर निधी राज्यशासनाकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहिकरीता मत्स्यव्यवसाय आयुक्त विधाते यांनी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाचे सर्व तांत्रिक बाबीही एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये प्रकल्पाच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. प्रथम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे ५०० मीटर सरकविण्यात आला. मात्र त्यानंतर अनेक कारणामुळे प्रकल्पाचे काम रखडले होते.या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून ती ८८.४ कोटींपर्यंत पोहोचली. सुरूवातील केंद्र्रशासनाचा ७५ टक्के निधी व राज्यशासनाचा २५ टक्के निधी या प्रकल्पासाठी देण्याचे ठरले. मात्र, त्यानंतर यामध्ये बदल होऊन केंद्रशासन २५ कोटी रुपये व राज्यशासनाने उर्वरीत रक्कम ६३.४ कोटी रुपये द्यावेत असे ठरले. त्यानुसार राज्यशासनाने ६३.४ कोटी रुपये मंजूर करून मागील बजेटमध्ये १० कोटी रूपयांची तरतुदही करण्यात आली होती. मात्र, केंद्र्रशासनाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत देवगड येथील आनंदवाडी बंदर प्रकल्प होता.