सावंतवाडी : सावरवाड येथे रस्त्याच्या वादातून सदानंद म्हाडगुत यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात म्हाडगुत यांचे हात व पाय जायबंदी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले असून, हा हल्ला केरळीयनांकडून झाल्याचे पुढे येत आहे. मात्र यात नेमके कोण होते हे अद्यापपर्यंत पुढे आले नसून, स्थानिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असे स्पष्ट केले आहे.सावरवाड येथे काही केरळीयन लोकांच्या जमिनी आहेत. या जमिनीकडे जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे. हा रस्ता म्हाडगुत यांच्या दारातून दिला जावा म्हणून दबाव आणला जात होता. पण तो रस्ता देण्यात आला नसल्याने संपप्त झालेल्या काही केरळीयनांकडून सदानंद म्हाडगुत यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला एवढा गंभीर होता की, म्हाडगुत यांचा हात व पाय जायबंदी झाला आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे.या घटनेची माहिती सावरवाड परिसरात समजताच एकच खळबळ उडाली. सुरुवातीला सदानंद यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
केरळीयन लोकांकडून हल्ला झाल्याने गावात संतापाची लाट असून, पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे. मात्र उशिरापर्यंत याबाबत पंचनामा तसेच जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. मात्र कोणालाही अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही.दरम्यान, सभापती रवींद्र मडगावकर यांनीही या घटेनेचा निषेध केला असून, बाहेरून येणारी व्यक्ती अशाप्रकारे स्थानिकांना मारहाण करत असेल तर ते योग्य नाही. त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.