सिंधुदुर्ग : राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) ची ४७ वी आंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुणे केंद्रावर झाली. या नाट्य स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नाट्यकर्मी विजय चव्हाण लिखित व सुहास वरूणकर दिग्दर्शित ‘भाविण’ या मालवणी नाटकास सांघिक प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
या स्पर्धेत ‘भाविण’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी सुहास वरुणकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. पुरुष अभिनयासाठी नित्यानंद जडये यांना तर नेपथ्यासाठी हरेश खवणेकर, दत्ता कुळे, गणपत घाणेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या नाटकाची निर्मिती सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची असून सूत्रधार विभागिय कर्मचारी वर्ग अधिकारी एल. आर. गोसावी हे आहेत. निर्मित्ति सहाय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, उपयंत्र अभियंता अजित मांगलेकर, विजय वालावलकर यांनी केले आहे.
या नाटकात प्रमोद तांबे, मारुती मेस्त्री, नित्यानंद जडये, अरुण पिळणकर, संजय ढोलये, सुधीर घवाळी, विनायक शेट्ये, कांचन खानोलकर, मिताली मालणकर, सुविधा कदम यांनी प्रमुख भुमिका केल्या आहेत. या नाटकाला पार्श्वसंगीत दिनेश गोगटे यांनी तर प्रकाश योजना उत्तम राऊळ यांची लाभली आहे. नेपथ्य सहाय्य आबा साप्ते, किशोर तांबट, जी.एम. खोचाडे, अमृत तेली, किशोर निपाणीकर यानी केले आहे. या नाटकाला लाभलेल्या यशाबद्दल नाट्य चमुतील कलावंतांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.१२ रोजी पारितोषिक वितरण !कणकवली येथे १२ आॅक्टोबर रोजी या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तर त्यानंतर ‘भावीण’ या नाटकाचा प्रयोग नाट्यरसिकांसाठी मोफत सादर करण्यात येणार आहे.