कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा चांगलीच वादळी ठरली आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान, त्यानंतर राणेंना झालेली अटक यांच्यामुळे शिवसेना-भाजपमधील संघर्ष आणखी पेटला. राणे आणि शिवसेना यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. राणे सातत्यानं शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत असून शिवसेनेकडूनही राणेंना तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे.
कालपासून नारायण राणे त्यांच्या होमग्राऊंडवर आहेत. काल ते कणकवलीत दाखल झाले. थोडीथोडकी नव्हे, तर ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो. त्यामुळे बरीच जुनी प्रकरणं माहीत आहेत. टप्प्याटप्प्यानं सगळी प्रकरणं बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. यानंतर राणे रात्री एका कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांसोबत गेले असताना त्यांना शॉक बसला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.
नारायण राणे कार्यक्रमस्थळी पोहोचले, त्यावेळी तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राणेंच्या स्वागताला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या रेलिंगला रोषणाई करण्यात आली होती. राणेंनी रेलिंगला हात लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. धक्का बसताच राणेंनी लगेच हात काढला. राणेंना धक्का बसताच त्यांच्या शेजारीच असलेले दरेकरदेखील सावध झाले. विजेचा धक्का बसलेल्या राणेंना कोणतीही दुखापत झालेली नाही.