ठळक मुद्देबिड़वाडी येथे घरफोडी , रोख रकमेसह 2 लाखांचा ऐवज लंपासठसे तज्ज्ञाना पाचारण !
कणकवली : तालुक्यातील बिडवाडी येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाली असून रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने असा 2 लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांने लंपास केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. काही दिवसांपूर्वी कळसुली येथेही अशाच प्रकारे चोरी झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे ठाकले आहे.बिडवाडी बौद्धवाडी येथे प्रदीप शांताराम तांबे हे पत्नी तसेच दोन मुलींसह रहातात. शुक्रवारी सकाळी त्यांच्या दोन्ही मुली कणकवली येथे महाविद्यालयात गेल्या होत्या. तर प्रदीप तांबे यांच्या वडीलांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यामुळे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास तांबे आपल्या जुन्या घरी वडिलांचे कार्य असल्याने पत्नीला घेऊन साफसफाईसाठी गेले होते. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास साफ़ सफाईचे काम झाल्यावर प्रदीप तांबे पुन्हा पत्नीला घरी सोडायला आले.
पत्नीला घरी सोडून ते परत बाहेर निघुन गेले. प्रदीप तांबे यांची पत्नी घरात आल्यानंतर घराचे मागील दार तिला उघडे दिसले. तसेच घरातील लोखंडी कपाटही उघडेच होते. तर कपड़े व इतर साहित्य अत्यावस्थ स्थितीत टाकलेले आढळून आले. त्यामुळे प्रदीप तांबे यांना पत्नीने लगेचच या घटने बाबत कळविले. त्यांनी घरी येऊन पाहिले असता घराच्या मागील दाराला भोक पडलेले दिसले.सिमेंटच्या या दाराला अज्ञाताने भोक पाडून कड़ी काढून घरात प्रवेश केला होता. तसेच कोणत्या तरी हत्याराने घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडण्यात आला होता. या कपाटातील तिजोरीतील रोख रक्कम 50 हजार रूपये लंपास करण्यात आले होते. तसेच 17 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र , 5 ग्रॅमची अंगठी , 10 ग्रॅम व 7 ग्रॅमचे दोन सोन्याचे हार , 6 ग्रॅमची चेन तसेच कुड़ी व रिंगचे जोड़ , चांदीचे पैंजण असा सुमारे दीड लाखांचा ऐवजही गायब करण्यात आला होता.हे दृश्य पहाताच प्रदीप तांबे व त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. त्यांनी शेजाऱ्याना या घटनेची माहिती दिली. तसेच कणकवली पोलिस ठाण्यातही या घटने बाबत तक्रार नोंदविली. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर हे पथकासह बिड़वाडी येथील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी केल्यावर पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.ठसे तज्ज्ञाना पाचारण !बिड़वाडी येथील या चोरीच्या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पहाणी करून पोलिस पथकाला तपासाबाबत काही सुचना केल्या. तर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यानी ठसे तज्ज्ञ तसेच फोरेन्सिक लॅबच्या टिमला पाचारण केले. या टिमने घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत. तपासाच्या दृष्टिने ते महत्वपूर्ण ठरणार आहे.