देवगड : गिर्ये येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांनी केलेल्या विरोधाला देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ, हनुमान युवक क्रीडा मंडळ व देवगड तालुका भंडारी समाज मंडळ या तिन्ही मंडळांनी पाठिंबा दर्शविला असून प्रकल्प होऊ घातलेल्या परिसरातील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार वनिता पाटील यांच्याकडे केली आहे.देवगड तालुक्यातील गिर्ये रामेश्वर व राजापूर तालुक्यातील नाणार येथील १४९०० एकर जमिनीवर ६० मिलियन मेट्रिक टनाचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. प्रत्यक्ष प्रकल्प नाणार येथे होणार असून गिर्ये रामेश्वर येथे कच्च्या तेलाचा साठा करण्यात येणार आहे. या सर्व परिसराला शासनाने ३२(२) ची नोटीस काढून औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे.मात्र हा प्रकल्प विनाशकारी, हानिकारक, प्रदूषणकारी असून स्थानिक आंबा बागायती व मासेमारी व्यवसाय संपूर्णपणे उद्ध्वस्त करणारा आहे. या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे शासनाने कोणतीही बळजबरी करून भूसंपादन करून प्रकल्प उभारू नये.
स्थानिक लोकांच्या विरोधाला पाठिंबा असून लोकभावना लक्षात घेऊन शासनाने हा प्रकल्प लगेच रद्द करावा अशी मागणी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ, हनुमान युवक क्रीडा मंडळ व देवगड तालुका भंडारी समाज मंडळ या तिन्ही मंडळांनी निवेदनाद्वारे तहसीलदार वनिता पाटील यांच्याकडे केली.यावेळी हनुमान युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, देवगड तालुका भंडारी समाज मंडळाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, हनिफ मेमन, सुधीर मांजरेकर, सुरेश सोनटक्के, भाई सावंत, आप्पा अनभवणे, प्रदीप मुणगेकर, प्रकाश सारंग, शिवप्रसाद पेडणेकर, उल्हास मणचेकर, बाळा जगताप, रविकांत चांदोस्कर, बाप्पा रूमडे, दिगंबर पेडणेकर, पंढरीनाथ आचरेकर, अजित वाडेकर, करूणा वराडकर, शरद लाड, मुकुंद देऊलकर आदी उपस्थित होते.