देवगड : अमावास्येच्या महाकाय भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असून या भरतीमुळे नाडण वीरवाडी खाडीवरील कॉजवे पाण्याखाली जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक भरती कालावधीमध्ये बंद होत आहे.
याबाबत वीरवाडी येथील ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी केली होती. मात्र, मेरीटाईम बोर्डाने याबाबत पतन विभागाकडे बोट दाखविल्याने कॉजवेची उंची वाढविण्याचा प्रश्न जैसे थे राहिला आहे.अमावास्येचा महाकाय भरतीचा वाढलेल्या पाण्याचा फटका किनारपट्टी भागाला बसत असून खाडीकिनारपट्टीलगत जाणारा वीरवाडी रस्त्याचा काही भागही पाण्याखाली जात आहे.
वीरवाडी रस्त्यावरील कॉजवेदेखील पाण्याखाली गेल्यामुळे भरती कालावधीत वीरवाडीमार्गे जाणारी मोंड बापर्डे येथील वाहतूक बंद होती. भरती संपल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
उधाणाच्या भरतीचे पाणी वीरवाडी कॉजवेवरून जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होते. त्यामुळे या कॉजवेची व वीरवाडी रस्त्यालगत खाडीकिनारी असलेल्या बंधाऱ्यांचीही उंची वाढवावी अशी मागणी वीरवाडी ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीला उत्तर देताना मेरीटाईम बोर्डाने सागरी धूप प्रतिबंधक बांधकामे ही राज्यस्तरीय योजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येत आहे असे आदेश पारीत झाले असून त्यामुळे सदर काम हे पतन विभागाकडून करणे उचित होईल असे उत्तर देऊन पतन विभागाकडे बोट दाखविल्याने हा प्रश्न ह्यजैसे थेह्ण राहीला आहे.ग्रामस्थांची नाराजीकॉजवेची उंची वाढविण्याशिवाय पर्याय नसून गेली कित्येक वर्षे वीरवाडी ग्रामस्थांकडून याबाबत मागणी होऊनही शासनस्तरावरून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे हा प्रश्न सुटणार केव्हा असा सवाल वीरवाडीवासीयांमधून व्यक्त होत आहे.