ओरोस : अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, प्रॉव्हिडंट फंड मिळावा, इन्शुरन्स काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अवैद्यकीय आरोग्य कामगारांनी सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. तसेच तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली अवैद्यकीय आरोग्य कर्मचारी कास्ट्राईब कल्याण संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांचे साखळी उपोषण सुरु केले आहे. यावेळी शशिकांत तांबे, सचिन तांबे, रवींद्र जाधव, सुचिता मेस्त्री, भक्ती आडाळकर आदी कामगार यावेळी उपस्थित होते.ओरोस येथील जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात ६५ अवैद्यकीय कंत्राटी आरोग्य कामगार कार्यरत आहेत. मात्र, हे कामगार पुरविण्याचा ठेका देण्यात आला असून संबंधित ठेकेदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप या अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. ठेका एकाच ठेकेदाराकडे असतांना या कामगरांना कमी जास्त वेतन दिले जात आहे.कराराप्रमाणे कंत्राटी अवैद्यकीय आरोग्य कामगारांचा इन्शुरन्स काढणे आवश्यक असताना तो काढण्यात आलेला नाही. तसेच या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे लाभ देणे बंधनकारक असतांनाही ते ठेकेदाराकडून दिले जात नाहीत याकडे वारंवार जिल्हा शल्य चिकित्सकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केला जात आहे.अन्यथा उपोषण !आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अवैद्यकीय आरोग्य कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांचे साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र, या दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे या कामगारांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग : अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:41 PM
अवैद्यकीय आरोग्य कामगारांनी सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.
ठळक मुद्दे अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषणमागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करणार