सावंतवाडी : गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गमधील रुग्णांकडून फी आकारली जात आहे. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून याबाबत चर्चा केली आहे. पुन्हा एकदा चर्चा करेन. मात्र हा सर्व घोळ जीएसटीमुळे झाला आहे. राज्य चालविण्यास जो पैसा लागतो तो येत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले, अशी जाहीर कबुली गोव्याचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.यावेळी मंत्री ढवळीकर म्हणाले, विश्वजित राणे हे आरोग्यमंत्री झाल्यावरच फीचा प्रश्न येतो असे काही नाही. मात्र मायनिंगमधून जो महसूल यायला पाहिजे तो येत नाही. तसेच जीएसटीमुळे सगळीकडे घोळ झाला आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला.
मात्र गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये जे काही शुल्क आकारले जात आहे त्याबाबत निश्चित असा मार्ग काढण्यात येणार आहे. मी स्वत: पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करेन आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. हा शुल्काबाबतचा वाद लवकरच मिटेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून गोवा सरकारला पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्याबाबत येथील पालकमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा. पत्रकारांनीही आपले एक निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच ब्राह्मण मंडळही आपले निवदेन पाठवेल, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.शस्त्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी घेऊसिंधुदुर्ग व गोव्याचे नाते लांबचे नाही. जर हे मेडिकल कॉलेज उभारताना येथील मंडळींनीही प्रयत्न केला असेल तर त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. यावर अभ्यास करू आणि शुल्क फक्त आकारतील, पण शस्त्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी निश्चित घेऊ, असेही ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.