सिंधुदुर्ग : कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्नाबरोबरच अन्य मागण्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिक्षक आमदार ना. गो. गाणार व आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने नागपूर येथे मुख्यमंत्र्यांबरोबर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.सेवाग्राम ते नागपूर 105 किलोमीटरचे अंतर पायी दिंडी काढून विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शेकडो शिक्षकांनी विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिस प्रशासनाने रस्त्यावर मोर्चा अडवल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. या संदर्भात शिक्षकांनी शासनाकडे इच्छामरणाची मागणी केली.
यावेळी शिक्षक आमदार ना. गो. गाणार व कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच शिक्षकांच्या मागणीविषयी ठोस भूमिका घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे व उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीचे तानाजी नाईक यांची शिष्टमंडळासह बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन योग्य आहे. त्यांच्या मागण्याही योग्य आहेत. नजीकच्या काळात सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी आर. झेड. बावीसकर, अजय भोयर, सुरेश कामनापुरे, प्रदिप जांगळे, एस.के. व्हाहुरवाघ, अमित प्रसाद, सुनिल कल्याणी, प्रकाश पाटील, गजानन काटकर यांच्यासह अन्य शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सहानुभूती : डावखरेकायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आपल्याला सहानुभूती आहे. आगामी काळात शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नागो गाणार यांच्यासह आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.