देवगड : तालुक्यातील वानिवडे ग्रामपंचायत शिवसेनेकडे असून सरपंच पदासहित ९ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे असून या ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पक्षाने केलेला दावा खोटा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड येथे वानिवडे सरपंच प्राची घाडी व नुतन ६ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दिली.
देवगड येथे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन विलास साळसकर यांनी केले होते. यावेळी वानिवडे गावच्या प्राची घाडी, वैष्णवी बांदकर, माधवी वाडेकर, कविता घाडी, स्वप्नील येरम, सपना टुकरुल, सुभाष घाडी, उपसभापती संजय देवरुखकर आदी उपस्थित होते.यावेळी साळसकर म्हणाले, वानिवडे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाची एकहाती सत्ता असून या सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवितेवेळी गाव विकास आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविली होती. मात्र, स्वाभिमानी पक्षाने वानिवडे ग्रामपंचायत ही स्वाभिमानी पक्षाची आहे असे जाहीर करण्यात आले होते.
शिवसेनेकडे ही ग्रामपंचायत नसून मातोश्रीवर शाबासकी मिळविण्याकरीता सेना नेत्यांनी ही ग्रामपंचायत आपल्याकडे असल्याचे स्वाभिमान पक्षाने सांगितले होते. यामुळे वानिवडे गावच्या सरपंचपदासहित सहा सदस्यांच्या उपस्थितीत आम्ही जाहीर करतो, ही ग्रामपंचायत शिवसेनेची आहे.
मातोश्रीवरील शाबासकी मिळविण्यासाठी खोटी माहिती देऊन शाबासकी मिळविण्याची शिवसेनेची वृत्ती नाही. चांगले काम करुन व आपले आहे ते आपले म्हणून कर्तुत्वाच्या गुणांवर मातोश्रीवर शिवसैनिक आशिर्वाद मिळवित असतात.