दोडामार्ग : खडी वाहतूक करणाऱ्या स्थानिक युवकांच्या डंपरवर पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना घेराओ घातला.
डंपर अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत प्रथम पोलिसांनी तालुक्यात बेकायदा सुरू असलेले दारूधंदे बंद करावेत. नको त्या उचापती करू नयेत, असे ठणकावून सांगितले.दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते. काही स्थानिक युवकांचे डंपर या व्यवसायात आहेत. गुरूवारी सकाळी स्थानिकांचे काही डंपर दोडामार्गमार्गे गोव्यात खडी घेऊन जात होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी हे डंपर अडवून ते कारवाईसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. त्यांनी याबाबत सेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले.
संतापलेल्या सेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना घेराओ घालत जाब विचारला. तालुक्यात राजरोसपणे दारूधंदे सुरू आहेत. ते पोलिसांनी प्रथम बंद करावेत. स्थानिकांच्या रोजगाराच्या आड येऊ नये, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर ज्यांच्याकडे खडी वाहतुकीचा परवाना होता ते डंपर सोडून देण्यात आले तर उर्वरितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.