सिंधुदुर्ग : मळगाव येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन बारा तासाच्या आत आरोपींना अटक करणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच सहकारी टिमचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.सावंतवाडी शहरालगत राहणाऱ्या एका अल्पवयीन कॉलेज युवतीवर चार दिवसांपूर्वी मळगाव रेल्वे स्थानक येथील लॉज व परिसरात तिघा नराधमांकडून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित युवतीने पोलिसात धाव घेत नराधमांविरोधात तक्रार देताच गुन्हा दाखल करत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच त्यांच्या सहकार्य टिमने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यातील मुख्य आरोपी रामचंद्र्र घाडी (रा. आकेरी-कुडाळ) व मळगाव-कुंभार्ली येथील प्रशांत व राकेश राऊळ या दोघा जुळ्या भावांच्या अवघ्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या.त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यास पोलिसांना सोपे झाले. मुळात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी वेगळी युक्ती अवलंबिल्याने मुख्य आरोपी ताब्यात आला. त्यामुळे अन्य दोघांची नावे समोर येताच त्यांनाही पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.शहरात या अगोदरही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, यातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत असे. मळगाव येथील या प्रकरणी तीनही आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची भूमिका उजवी ठरली.नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे आदींनी धनावडे यांची भेट घेत त्यांचे कौतुक केले.