सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा मुंबईत सुटणार, येत्या शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक
By अनंत खं.जाधव | Published: October 4, 2023 05:23 PM2023-10-04T17:23:02+5:302023-10-04T17:26:04+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग काँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून उद्भवलेला तिढा आता मुंबईत सुटणार असून यासाठी येत्या शनिवारी (दि.७) बैठकीचे आयोजन करण्यात ...
सावंतवाडी : सिंधुदुर्गकाँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून उद्भवलेला तिढा आता मुंबईत सुटणार असून यासाठी येत्या शनिवारी (दि.७) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांची एकत्रित बैठक होणार आहे. या दोन्ही बैठका असल्याने अनेक पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष पद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
विदर्भ मराठवाड्यानंतर आता काँग्रेसने आपला मोर्चा कोकणकडे वळवला आहे. कोकणात काँग्रेसची ताकद नगण्य झाल्याने ही ताकद कशी वाढवायची यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. प्रदेश काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्याला एक-एक तास बैठकीसाठी देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलविण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात प्रभारी जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करून त्या जागी नव्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर अवघ्या २४ तासाच्या आत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठवल्यानंतर प्रदेश काँग्रेसला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. यामुळे काँग्रेसमधील स्थानिक पातळीवर अर्तंगत वाद ही उफाळून आला होता. समीर वंजारी यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित करून पुन्हा पूर्वीचे ईशाद शेख याच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशस्तरावरील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे पालकत्व कोल्हापूरचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे आहे. याबैठकीत सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.