सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यावरून जिल्हा परिषद सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पालकमंत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत असल्याचे सांगत त्यांच्या अभिनंदनाच्या सदस्य संजय पडते यांनी मांडलेल्या ठरावाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ताधारी सदस्यांनी कडाडून विरोध केला.
केवळ निधी मंजूर झाल्याचे ऐकत आहोत प्रत्यक्षात निधी दिसतच नाही, कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत असा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी सभेत केला. तसेच निधी खर्च केल्याचा तसेच मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा पुरावा सादर करा असे सत्ताधारी सदस्यांनी सांगत पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहाने फेटाळून लावला.जिल्हा परिषद सर्व साधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, विषय समिती सभापती प्रीतेश राऊळ, संतोष साटविलकर, शारदा कांबळे, सायली सावंत, समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सदस्य सतीश सावंत, संजय पडते, प्रदीप नारकर, सरोज परब, नागेंद्र परब, सावी लोके, संजना सावंत, सुधीर नकाशे, संजय आंग्रे, राजेंद्र म्हापसेकर यांच्या सह अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच अभिनंदनाचे ठराव घेणे सुरू असतानाच शिवसेनेचे सदस्य संजय पडते यांनी सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.या ठरावास गटनेते सतीश सावंत यांनी विरोध करत निधीचे विश्लेषण करण्याची सूचना केली. जिल्हा परिषद विकास कामावरील याद्यावर पालकमंत्र्याच्या सह्या नाहीत. त्यामुळे या ठरावास आमचा विरोध असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटाचे सदस्य आमनेसामने आले होते.वनविभागाचे कर्मचारी रात्री अपरात्री शेतकऱ्याच्या घरात जाऊन तेथील शेतकऱ्यांकडील शेतीच्या संरक्षणासाठी असणारी बंदुक जप्त केली व संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून त्याला सभागृहाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सदस्य गावडे यांनी केली.
शेतीच्या संरक्षणासाठी परवानाधारक बंदुक स्वत:जवळ ठेवणे हा गुन्हा आहे का असा सवाल उपस्थित करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी या सभेत दिले.
आॅर्डर नसल्याने काम रखडलेगगनबावडा ते वैभववाडी हा घाटरस्ता खड्डेमय झाल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी तब्बल साडेचार कोटी रुपये मंजूर असूनही आॅर्डर अभावी हे काम पूर्णपणे रखडले आहे. यावर लवकरच तोडगा निघून हे काम मार्गी लागावे अशी मागणी सदस्य सुधीर नकाशे यांनी केली. वैभववाडी तालुक्यातील अर्धवट असणारी अनेक विकासकामे व समस्याबाबत नकाशे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे लक्ष वेधले.