सावंतवाडी : वादग्रस्त जमिनीत कुंपण घातल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील तिघा सदस्यांना चौघांकडून मारहाण झाली. ही घटना रविवारी आंबोली - बाजारवाडी येथे घडली.याबाबत जखमी दत्ताराम रामचंद्र कर्पे (४०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात आपल्यासह आई व वहिनीला शिविगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच कुत्रा अंगावर सोडल्याने त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केल्याचे म्हटले आहे.त्यानुसार विनोद विजय जाधव (३९), विजय कृष्णा जाधव (६४), सुधाकर कृष्णा जाधव (५९) व विद्या जाधव या चौघांवर आंबोली दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली. कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विरोधक आणि आपल्या जमीन जागेचे वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या शेतघराशेजारी दगडी कुंपण उभारत होते.कुत्र्याने चावा घेतल्याने दोघांना गंभीर दुखापतयावेळी मी आणि माझे घरातील सदस्य त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो. त्याचवेळी त्यांनी शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सुरू असलेले काम रोखण्यासाठी मी पुढे गेलो असता त्यांनी हाताच्या थापटांनी व दगडांनी माझ्यासह परिवारातील सदस्यांना मारहाण केली. तसेच आपला कुत्रा आमच्या अंगावर सोडला. यावेळी त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केली, असे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sindhudurg Crime: जागेचा वाद, कुत्रा अंगावर सोडून तिघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 6:02 PM