वैभववाडी : गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाचा हेत, आखवणे मांगवलीसह अन्य काही गावांना अंशत: तडाखा बसला. आखवणेतील धाकूबाई मंदिरासह मांगवलीतील घरांच्या छपरांचे नुकसान झाले. तर अरुणा प्रकल्पानजीक वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने विजेचे चार खांब मोडून पडले. त्यामुळे तीन गावात अंधाराचे साम्राज्य आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही तालुक्याच्या काही भागात किरकोळ पाऊस झाला.बुधवारी सायंकाळी गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा परिसराला अक्षरश: झोडपून काढले. कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस तालुक्यात सर्वत्र झाला. परंतु आखवणे खोऱ्याला वादळाचा तडाखा बसला.
आखवणेतील धाकूबाई मंदिराच्या छपराचे नुकसान झाले. तसेच हेतमध्ये निवारा शेडचे पत्रे उडाले. भोममधील सत्यवती सावंत यांच्या घरावर फांदी पडली. आखवणेतील स्वप्नाली नागप, जगन्नाथ नागप व तलाठी कार्यालयाताच्या छपराचे नुकसान झाले.मांगवली लोकमवाडी, संसारेवाडीला वादळाचा तडाखा बसला. लोकमवाडी येथील हनुमंत पांचाळ, जगदीश डिके, बाबाजी रामाणे, चंद्रकांत नारकर, शांताराम सुतार यांचे तर संसारेवाडीतील दिगंबर संसारे व डॉ. निकम यांच्या घरांच्या छपरांचे नुकसान झाले. तलाठी प्रमोद वाल्ये यांनी नुकसानीचा पंचनामा केला. तसेच जांभवडेतील शंकर धावले यांच्या घराचेही अंशत: नुकसान झाले.आखवणे-भोम, मौदे गावांचा वीजपुरवठा खंडितवादळी पावसामुळे हेत, आखवणेत वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अरुणा प्रकल्पानजीक सिमेंटचे चार खांब मोडून पडले. तर काही लोखंडी खांब वाकले आहेत.
बुधवारी रात्रीपासून हेतसह आखवणे-भोम व मौदे या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तीन गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या अनेक ठिकाणच्या नुुुुकसानीचा तपशील गुरुवारी उशिरापर्यंत तहसीलमध्ये नोंदविला गेला नव्हता.