सिंधुदुर्गनगरी : रानबांबुळी पालकरवाडी (सटवीचे गाळू) या जंगलमय भागात हात व पायाचे पंजे नसलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे.हा मृतदेह ३१ मे २०१८ पासून बेपत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील मूळ बागलकोट येथील युवक आनंद पांडुरंग राठोड (३०) सध्या रा. ओरोस यांचा असल्याचे प्रथमदर्शनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. मात्र, हा घातपात असल्याचा आरोप राठोड याच्या कुटुंबाने केला आहे.आनंद पांडुरंग राठोड (३१) हे मे महिन्यात कामानिमित्त कसाल येथे गेले होते. मात्र, ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबाने ओरोस पोलीस ठाण्यात आनंद बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, गुरुवारी रानबांबुळी पालकरवाडी सटवीचे गाळू या जंगलमय भागात काहीतरी कुजल्याचा दुर्गंध येऊ लागला. याबत रानबांबुळी पोलीस पाटील प्रकाश मुणगेकर यांनी त्या जंगलभागात जाऊन पाहणी केली असता हात आणि पायाचे पंजे नसलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मुणगेकर यांनी याबाबतची खबर ओरोस पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच ओरोस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सापडलेला हा मृतदेह बेपत्ता आनंद राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याचा अंदाज आल्याने पोलिसांनी आनंद यांच्या कुटुंबाला बोलावून घेतले. आनंद यांची आई व भाऊ यांनी हा मृतदेह बेपत्ता आनंद यांचा असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.मृतदेहाची ओळख पटली असली तरी आनंद यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मृतदेहाची स्थिती पाहता हा घातपात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यावर हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? की घातपात? याबाबत स्पष्टता होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.आनंदचा घातपातच; कुटुबियांचा आरोपआपला मुलगा मोलमजुरी करून आपल्या तीन मुलांसह पत्नीची उपजीविका करत होता. मात्र, ३१ मे रोजी कामासाठी गेला तो परत घरी आला नाही. आज त्याचा मृतदेह रानबांबुळीजवळील जंगलमय भागात मिळाला. मात्र, मृतदेहाची स्थिती पाहता हा घातपात असल्याचा आरोप मृत आनंद राठोडच्या कुटुंबाने केला आहे.