कुडाळ : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या ओंकार अशोक परब (२४, रा. वाघचौडी, नेरूर) या युवकाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे ओंकारच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या ओंकार परब या युवकाच्या मृतदेहाचा सांगाडा त्याच्या घराजवळील दोनशे मीटर अंतरावर असलेल्या वाघचौडी-चिरेखाण येथील जंगलमय भागात आढळून आला होता. मृतदेहानजीक नॉयलॉन दोरी सापडली होती.
त्यामुळे ओंकारचे कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यातच रविवारी नेरूर परिसरातील काही ग्रामस्थांच्या व्हॉटस्अपवर ओंकारचा मृतदेह ज्या झाडाखाली आढळला, त्याच झाडावर फास लावलेल्या दोरीचा फोटो प्रसिध्द होत असल्याने परब कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांची भेट घेतली.मृतदेहाच्या बाजूला पोलिसांना नॉयलॉनची दोरी सापडली होती, तर व्हायरल झालेल्या फोटोत जाड दोरी दिसत असल्याने हा घातपात की आत्महत्या याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता लक्ष लागून राहिले आहे.प्रश्न अद्याप निरुत्तरीतव्हॉटस्अॅपवर ओंकारचा मृतदेह ज्या झाडाखाली आढळला, त्याच झाडावर फास असलेल्या दोरीचा फोटो प्रसिध्द होत आहे. मात्र हा फोटो कोणी व्हायरल केला, हा प्रश्न अद्याप निरूत्तरीत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.