वेंगुर्ले : जिओ कंपनीच्या लाईन टाकण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली होती. कंपनीकडून वाढीव २५० मीटर लांबीच्या खोदकामाची परवानगी मागितली आहे. मात्र याला नगरसेविका शीतल आंगचेकर यांनी विरोध केला. यापूर्वी परवानगी दिलेली कामे अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे त्या भागातील लोकांना त्रास होत आहे. असे असताना पुन्हा खोदाई करण्यास परवानगी कशी काय देता? असा सवाल आंगचेकर यांनी उपस्थित केला.वेंगुर्ले नगरपरिषदेची मासिक सभा सोमवारी नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, संदेश निकम, दादा सोकटे, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, सुमन निकम, कृपा गिरप, अधीक्षक सुरेल परब आदी उपस्थित होते.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मालकीचे संगीत रिसॉर्ट हॉटेल भाडेतत्त्वावर रमेश नाईक यांना चालवायला दिले होते. मात्र थकीत बिलापोटी वेंगुर्ले नगरपरिषदेने संगीत रिसॉर्टला सील केले होते.
यासंदर्भात रमेश नाईक यांनी पालिकेला दिलेल्या पत्रावर पालिका सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक तुषार सापळे, संदेश निकम, विधाता सावंत यांनी प्रशासनास धारेवर धरले. चर्चेअंती संगीत रिसॉर्टचे सील केलेले सामान ताब्यात न घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.