सिंधुुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री बांदा-दाणोली रस्त्यावर विलवडे येथे कार (एमएच ०४, डीडब्ल्यू १९३५) वर केलेल्या कारवाईत २ लाख ५८ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी रविराज अंबाजी सावंत (२६, रा. तांबोळी, खालचीवाडी ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांदा-दाणोली मार्गावरुन गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक मंगळवारी रात्री विलवडे-बांदा-दाणोली रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी विलवडे गावच्या हद्दीवर ही कार तपासणीसाठी कार चालकाला कार थांबविण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला.मात्र, यावेळी कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती कार समोरच असलेल्या दगडावर जाऊन आढळली. यावेळी यात कारमधून मद्याची वाहतूक होत असल्याचे प्रथम दर्शनी या भरारी पथकाला दिसून आले. त्यामुळे या कारची संपूर्ण तपासणी केली असता या कारमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे विविध प्रकरचे ३० खोके आढळून आले. याची किंमत २ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे.सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक पी. एल. पालकर, जवान शिवशंकर मुपडे, एम. एस. पवार, सहदेव सुर्वे, संतोष पालकर या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
युवक ताब्यातगोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील रविराज अंबाजी सावंत (२६) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अवैध दारू व कार असा ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल या भरारी पथकाने ताब्यात घेतला आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.