सिंधुदुर्ग : विद्युत शेती पंपाचे वीज बिल न देताच बिलाची रक्कम वसूल करण्याचा अजब फंडा महावितरण कंपनीने सुरू केला होता. मात्र यास अनेक शेतकऱ्यांनी विरोध करून छापील स्वरूपात बिल देण्याची मागणी केली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीसमोर नमते घेत कंपनीकडून शेती पंपाचे छापील बिले देण्यात आली आहेत.महावितरण कंपनीकडून शेती पंपाचे छापील वीज बिल निर्धारित कालावधीत पूर्वी शेतकऱ्यांना दिले जात असे. मात्र त्याला फाटा देऊन आता एक नवीनच अजब फंडा कंपनीने सुरू केला होता. वीज बिल न देताच बिलाची ६५० रूपये रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना सांगितले गेले.
या फंड्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले होते. छापील स्वरूपात बिल नसताना रक्कम भरायची कशी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रक्कम भरण्यास नकार देत छापील बिले देण्यास कंपनीला भाग पाडले.दरम्यान, वाढत्या वीज बिलांमुळे येथील शेतकरी तसेच अन्य वीज ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीकडील अपुरा कर्मचारी वर्ग, जुन्या, जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, गंजलेले खांब तसेच इतर कारणांमुळे ग्रामीण भागात वीज सेवेचा पुरता बोजवारा उडत आहे.
घरगुती वापराच्या वाढत्या वीज बिलांमुळे तर वीज ग्राहकांचे कंबरडेच मोडले आहे. शेती पंपाच्या वीज भाडे आकारणीबाबात कंपनीने सुरू केलेल्या या नवीन फंड्यामुळे शेतकरी वर्गातही नाराजी होती.