सावंतवाडी : महाराष्ट्रावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याने शासन वेगवेगळ््या पद्धतीने महसूल गोळा करण्याच्या मागे लागले आहे. मात्र, सावंतवाडी याला अपवाद आहे. येथे कुंपणच शेत खात असल्याने तालुक्यातील नेतर्डेत विनापरवाना उत्खनन होऊनसुद्धा महसूल यंत्रणेला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे शासनाचा दीड वर्षापासून जवळपास एक कोटीचा महसूल बुडल्याचे पुढे येत आहे. हे उत्खनन नेतर्डेतील साडेतीनशे एकर सामाईक जमिनीवर झाले आहे.दरम्यान, या प्रकाराविरोधात लढा देणारे नेतर्डेतील ग्रामस्थ जगदेव गवस हे बुधवारपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे येथील साडेतीनशे एकर सामाईक जमिनीवर गेल्या दीड वर्षापासून विनापरवाना गौण खनिज उत्खनन सुरू आहे. याबाबत कोणतीही परवानगी या उत्खनन करणाऱ्यांनी घेतली नाही.
हे उत्खनन करणारे गोव्यातील असून जागेचा बिनशेती तसेच पर्यावरण दाखला महसूलकडे भरण्यात येणारे पैसे असे कोणतेही नियम या उत्खनन करणाºयांनी पाळले नाहीत. दिवसाला या जमिनीतून हजारो ब्रास उत्खनन केले जात आहे. हा सर्व माल परस्पर गोव्याला नेऊन विकला जात असल्याचे पुढे आले आहे.नेतर्र्डेतील स्थानिक ग्रामस्थ जगदेव गवस या विरोधात गेले वर्षभर वेगवेगळ््या पातळीवर लढा उभारत आहेत. त्यांनी सावंतवाडी तहसीलदार तसेच प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला. पण यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
उलट जगदेव गवस यांच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप या महसूल यंत्रणेकडून करण्यात आले आणि त्यांना गप्प बसविण्याचे प्रयत्न झाले. तरीही गवस यांनी हा लढा जिल्ह्यातून मुंबईपर्यंत नेला. मुंबई येथे कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी गवस यांच्या पत्राची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पण अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी सिंधुदुर्गच्या महसूल यंत्रणेला पत्र पाठवून विनापरवाना गौण खनिज उत्खनन झाले असेल तर प्रत्यक्ष पाहणी करा आणि माहिती पाठवा, असे सांगितले. पण अद्याप या जागेची पाहणी करण्यात आली नसल्याचे पुढे आले आहे.
शासन एकीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे सांगत वेगवेगळ्या मार्गाने महसूल वाढावा यासाठी प्रयत्न करते. पण नेतर्डेत तर उलटेच पहायला मिळत आहे. विनापरवाना गौण खनिज उत्खनन सुरू असून, कोट्यवधींचा महसूल यामुळे बुडत असतानाही कोणतीही कारवाई करण्यास महसूल यंत्रणेला किंवा त्यांच्या वरिष्ठांना वेळ नसल्याचे यातून दिसून येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.महसूलचा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यातनेतर्डेतील अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणात सावंतवाडीतील महसूलचा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून, हा अधिकारी शासनाचा महसूल वाढविण्याचे सोडून स्वत:चा महसूल वाढविण्याच्या मागे आहे, असा आरोप जगदेव गवस यांचा असून या अधिकाऱ्यांविरोधात महसूलच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. तो अधिकारी लवकरच चौकशीच्या फेऱ्यात येईल, असे गवस यांनी सांगितले.प्रांताधिकाऱ्यांना पाहणीचे आदेश : पांढरपट्टेनेतर्डेतील अनधिकृत गौण खनिज उत्खननाच्या तक्रारीबाबत माहिती घेण्यात येईल. तसेच याबाबत सावंतवाडीच्या प्रांताधिकारी यांना नेतर्डेत जाऊन पाहणी करण्यास सांगणार आहे, असे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. याबाबतची योग्य माहिती घेऊन त्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार : जगदेव गवसनेतर्र्डेतील अनधिकृत गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. पण महसूल यंत्रणेला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अनेक अधिकारी हे शासनाचा महसूल वाढण्यापेक्षा स्वत:चा महसूल वाढविण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे माझा हा लढा शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे, असे जगदेव गवस यांनी सांगितले.