सिंधुदुर्ग : आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाची आईशी भेट न झाल्याने अखेर कुडाळ वनविभागाने त्याला पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालयाच्या ताब्यात दिले.सोमवारी सकाळी तेंडोली येथील आराववाडी-कुंभारवाडीच्या जवळील डोंगराच्या पायथ्याकडून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. त्याची भेट आईशी व्हावी या हेतूने वनविभागाने तेंडोली येथे सोमवारी रात्रीपासून मोहीम सुरू केली होती.
ही मोहीम कुडाळ वनविभागाचे अधिकारी प्रदीप कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात आली. यावेळी काही कॅमेरेही लावण्यात आले होते.मात्र मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत बिबट्याची मादी तेथे फिरकली नाही. त्यामुळे पिल्लाची प्रकृती पाहता त्याला पुणे-कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालयाच्या ताब्यात देण्याचे ठरले.
मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोकितकर व अन्य कर्मचाऱ्यांनी कात्रजचा प्रवास सुरू केला. बुधवारी सकाळी त्याला प्राणी अनाथालयाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पिल्लाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याने त्याला कात्रज अनाथालयात नेण्याचा निर्णय घेतला.