सिंधुदुर्गनगरी : समाधानकारक पावसाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लावणीची कामे २३ टक्के पूर्ण झाली आहेत. १२९४२ हेक्टर क्षेत्रावर लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २९०० हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे झाली आहेत.जिल्ह्यात ५५९०० हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यासाठी ५५९० हेक्टर क्षेत्रात पेरणी होणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात ५०७२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आली होती. यात निमगरवे २०५७ हेक्टर क्षेत्र, हळवे १०१० हेक्टर व गरवे २००५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी ९१ टक्के होती.
दरम्यान जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पडत असलेल्या पावसाच्या जोरावर लावणीच्या कामांना वेग आला आहे. १२९४२ हेक्टर क्षेत्रात लावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात आघाडीवर कुडाळ तालुका असून सर्वात कमी लावणीचे काम दोडामार्ग तालुक्यात ४७२ हेक्टरवर झाले आहे. पावसाने सातत्य राखले तर जुलै महिन्यात शेतीची कामे पूर्ण होतील असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४१.५ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत १७१२.९३ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय दोडामार्ग ९० (१४८०), सावंतवाडी ५५ (१५५४), वेंगुर्ला २२ (१७६९), कुडाळ ४० (१६०२.५), मालवण २७ (१९७६), कणकवली ५९ (१४८०), देवगड १० (२२६२), वैभववाडी २९ (१५८०) असा पाऊस झाला आहे.