सिंधुदुर्ग - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँकेसाठी गुरूवारी ९८ टक्के मतदान झाले. आता थोड्याच वेळात सिंधुदुर्ग नगरीतील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उडी घेऊन राणेंचा पराभव करण्यासाठी रणनिती आखली आहे. आज दुपारपर्यंत बॅंकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय संतोष परब यांच्यावर खूनी हल्ला झाल्यानंतर या प्रकरणात नितेश राणे यांचे नाव आल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र कालच तो न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणामुळे जिल्हा बँक निवडणूक खूपच गाजली. नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला यश मिळणार की सतीश सावंत महाविकास आघाडीच्या रूपाने वर्चस्व अबाधित ठेवणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी सिंधुदुर्गनगरीत कडेकोट बंदोबस्त ठेवला असून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कालच प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.