सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या बदलांचे वारे वाहू लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कणकवली तालुक्याला मिळणार असल्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. मात्र, दरवेळी धक्कातंत्र वापरणारे खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणे अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्यात आणि कोणाच्या गळ्यात टाकणारे हे मात्र गुलदस्त्यात आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता आहे. या पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या सर्वांना संधी या धोरणानुसार जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधील पदाधिकारी पदेही सव्वा सव्वा वर्ष देण्याची पध्दत सुरु केली आहे.
या धोरणानुसार सध्या जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, सभापती तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती यांची सव्वा वर्षाची मुदत २१ जूनला पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या सर्व पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहे.अध्यक्षपदी रेश्मा सावंत तर उपाध्यक्ष पदी रणजित देसाई हे २१ मार्च २०१७ रोजी विराजमान झाले होते. तर विषय समिती सभापती म्हणून संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, सायली सावंत, शारदा कांबळे यांनी ७ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला होता.या सर्वांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपत आला आहे. यामुळे या सर्वांसह स्वाभिमानची सत्ता असलेल्या सर्व पंचायत समित्यांमधील सभापती, उपसभापती यांच्या बदलांचे वारे वाहू लागले आहे. यामुळे या पदांवर डोळा ठेवून असलेल्यांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आणि या पदांवर वर्णी लागावी यासाठीची मोर्चेबांधणीही संबंधितांनी सुरु केली आहे.राणेंच्या निर्णयाकडे लक्ष
- सध्या या पदांसाठी बरीच नावे चर्चेत आहेत. मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची वाट ही मंडळी आतुरतेने पाहत आहेत. मात्र तोपर्यंत चुपके चुपके या पदांची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठीची चाचपणीही सुरु केली आहे.
- दरम्यान पक्षाध्यक्ष नारायण राणे हे आपल्या नेहमीच्या स्टाईलने पुढील सव्वा वर्षासाठी ही पदे कोणाला देणार हे मात्र तेव्हाच निश्चित होणार आहे.