सावंतवाडी : महाराष्ट्रात जरी शिंदे फडणवीस सरकार असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिंदे गटाचा कुठेच प्रभाव दिसत नाही. शिंदे गटाचा मेळावा वगैरे झाला असता तर काही चेहरे समोर आले असते, असे स्पष्ट मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयसिंग मिश्रा हे लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघनिहाय आढावा बैठक घेणार आहेत. या बाबतच्या नियोजनासाठी सावंतवाडीत पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तेली म्हणाले की, राज्यात शिंदे गट भाजपसोबत आघाडीत असला तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचे हे पक्षाकडून आदेश आल्यानंतर ठरविण्यात येईल. आम्ही पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळेच पक्षाचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो. आगामी निवडणुकीत काय भुमिका घ्यायची ते ठरवू असे सांगत तेली यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या स्वागताला जाणार का? या विषयाला बगल दिली. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचा कुठेही प्रभाव दिसत नसल्याचे मत मांडले जर एखादा मेळावा किंवा बैठक वगैरे झाली असती तर काही चेहरे समोर आले असते पण तसे काही झाले नाही. त्यामुळे येथे शिंदे गटाचे कुठेही वर्चस्व कुठे दिसत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर शिवसेनेचे काही आजी-माजी पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असून ते केव्हाही भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही त्यांनी बोलून यावेळी दाखवली.
भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार केसरकर यांच्या विरोधात पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी केल्या आहेत याबाबत तेली यांना विचारले असता त्यांनी अशा तक्रारी काही झाल्या असतील तर मला माहित नाही.तसेच पक्षात लोकशाही असून कोणीही आपले मत मांडू शकतो, असेही तेली म्हणाले. तसेच भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या कोणीही संपर्कात नसल्याचा खुलासाही तेली यांनी यावेळी केला.