सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपची ताकद असल्याने या ठिकाणी कमळ चिन्हावर निवडून आलेला पालकमंत्री व्हावा अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचेही तेली यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तेली म्हणाले, आडाळी येथे एमआयडीसीसाठी जागा घेण्यात आली असून त्या जागेवर अद्याप कुठलेही उद्योगधंदे आले नाहीत. जागेतील प्लॉटचे वितरणही झाले नाहीत, ते लवकर व्हावेत म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक झाली त्यांनी या प्रश्नावर तत्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे तेली यांनी सांगितले.
महामार्गावरील खड्डे बुजवामुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होऊ नये म्हणून हे खड्डे येत्या पाच ते सहा दिवसात बुजवावेत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. याबाबत येत्या दोन दिवसात मुंबईत बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.प्रशासकीय कामे मार्गे लागण्यासाठी केसरकारांसोबतसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोण मंत्री कोण आमदार हे आम्ही बघणार नसून जिल्ह्यातील प्रशासकीय कामे मार्गी लागली पाहिजेत यासाठी मंत्री दीपक केसरकर यांचेही सहकार्य घेतले जाईल असे तेली म्हणाले.यावेळी या पत्रकार परिषदेस आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, पुखराज पुरोहित, आनंद नेवगी, केतन आजगावकर उपस्थित होते.