सिंधुदुर्गनगरी : एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असताना जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खालावली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी यांनी आरोग्य समितीच्या सभेत केला. तसेच जिल्ह्यात माकडतापाचे रुग्ण आढळत असताना या तापाच्या तपासणीसाठी लागणारे स्पॉट टेस्ट किट जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची बाब या सभेत उघड झाली.आरोग्य समितीची सभा सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. डी. नांद्रेकर, सदस्य हरी खोबरेकर, जेरॉन फर्नांडिस, उन्नती धुरी, शर्वाणी गावकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.या सभेचा अजेंडा सदस्यांना पोहोचला नाही. केवळ दूरध्वनीवरून सदस्यांना सभेची माहिती देण्यात आली. यामुळे काहींना वाटले दुपारी सभा आहे. सभेचा अजेंडा किमान आठ दिवस आधी मिळणे अपेक्षित असताना तो मिळाला नसल्याने सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशासनाने आपली चूक मान्य केली. सभापती प्रीतेश राऊळ यांनी यापुढे असे करू नका. नियमित कालावधीत अजेंडा पोहोचेल याची काळजी घ्या, असे आदेश दिले.डीएमपी तेल व डोस यांचे ९० टक्केपेक्षा जास्त वितरण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या आजाराबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी शाळेच्या प्रार्थनेवेळी शाळेत जाऊन मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश राऊळ यांनी दिले.
गेल्या दीड महिन्यात डेंग्यूचे ९, मलेरियाचे ६ तर माकडतापाचे २२ रुग्ण आढळल्याचे हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी सांगितले. कुष्ठरोगाचे महिन्याला ४ ते ५ रुग्ण आढळतात. क्षयरोगाचे आतापर्यंत १०४५ थुंकी नमुने घेण्यात आले असून ३९ दूषित आढळले आहेत. त्यातील ३० क्षयरोग आजाराचे आहेत. सध्या ७७ व्यक्तींवर क्षयरोग उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद निधीतून २० वैद्यकीय अधिकारी व २० प्रयोग शाळा तंत्रज्ञ भरतीला मान्यता दिली.बांदा आरोग्यकेंद्रात शासनाची रुग्णवाहिका आहे. काही दिवसांपूर्वी माझे दीर येथे उपचारासाठी आले होते. ते गंभीर आजारी असल्याने रुग्णवाहिकेची गरज होती. यावेळी गाडी होती. पण चालक नव्हता. चालक आले तर डॉक्टर नव्हते. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. यंत्रणा पुरविण्याचे काम जिल्हा रुग्णालयाचे आहे. जिल्ह्यात सर्व सुविधा चांगल्या आहेत पण आरोग्य यंत्रणा खालावलेली आहे, असा आरोप उन्नती धुरी यांनी केला.स्पॉट टेस्ट किट उपलब्ध नसल्याची माहितीजिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी माकडतापाच्या साथीने थैमान घातले होते. यावर आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करीत ही साथ आटोक्यात आणली आहे. असे असले तरी जिल्ह्यात माकडतापाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र या तापाची निश्चिती करण्यासाठी आवश्यक असणारे स्पॉट टेस्ट किट जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे या सभेत आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यामुळे माकडतापाचा रुग्ण आढळण्यास त्याची तपासणी करताना अडचण येत असल्याचेही सांगण्यात आले. यावर ही किट लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापती प्रीतेश राऊळ यांनी सभेत दिले.