कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचासिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे.
या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ५ गाड्या व हंगामी ९ गाड्यांची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. तर येणाऱ्या गाड्यांबरोबरच परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातएसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. यावेळी अशोक राणे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे लगत साळीस्ते येथे २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत चेकपोस्ट सुरू करण्यात येणार आहे. ते २४ तास सुरू राहणार आहे. त्याठिकाणी वाहतुक नियंत्रक व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.३० ऑगस्ट पासून साधारणतः सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरू होणार आहे. यंदा चाकरमान्यांना घेऊन सुमारे ८७ गाड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबई व उपनगरातून ६६ गाड्या, पुणे तसेच इतर भागातून २१ गाड्यांचा समावेश आहे.
३० ऑगस्ट रोजी ३१ गाड्या, ३१ ऑगस्ट रोजी ५५ गाड्या तर १ सप्टेंबर रोजी १ गाडी सिंधुदुर्गात दाखल होईल. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी ५७ गाड्यांचे बुकिंग झाले आहे.मुंबईकडे जाणाऱ्या नियमित पाच गाड्या सध्या सुरू आहेत. यात मालवण- मुंबई, कणकवली- बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , विजयदुर्ग - मुंबई या बसफेऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय २८ ऑगस्ट ते १सप्टेंबर या कालावधीत ९ हंगामी गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
७ ते १३ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी - बोरिवली, मालवण- बोरिवली, कणकवली- बोरिवली, कुडाळ बोरिवली, देवगड- बोरिवली, विजयदुर्ग - बोरिवली , फोंडा- बोरिवली, कणकवली पाचल मार्गे बोरिवली, वेंगुर्ले बोरिवली या गाड्यांचा समावेश आहे.कणकवली आणि सावंतवाडी येथे फिरते दुरुस्तीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत अंतर्गत जादा व नियमित गाड्या सोडण्याबाबतचेही नियोजन आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे. तर परतीच्या प्रवासासाठीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. आगार व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबई तसेच इतर ठिकाणी काही गाड्या पाठविल्याने जिल्हांतर्गत सेवेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे.एसटीच्या आरक्षणाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाटे, विजयदुर्ग या भागातील प्रवासी मुंबईवरून रेल्वेने रत्नागिरी पर्यंत येतात. त्यांना त्यांच्या गावी पोहचण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. असेही रसाळ यांनी यावेळी सांगितले.एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्या !गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी एसटीच्या या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहनही प्रकाश रसाळ यांनी यावेळी केले.