कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता एसटीच्या गाड्या सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज झाला आहे.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ३४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या २४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकरिता मुंबई, मुंबई उपनगर, पुणे व राज्यातील इतर ठिकाणांवरून सिंधुदुर्गात येण्याची सोय राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. चाकरमान्यांकरिता दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी राहणार असल्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. बुधवारपासून आॅनलाईन संगणक आरक्षण प्रणाली फेºया उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना ई-पास बंधनकारक असणार नाही. त्याचप्रमाणे चाकरमान्यांसाठी एसटीच्या गाड्या या नेहमीच्या बसस्थानकांवरून सोडण्यात येणार असून त्या थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकावर थांबणार आहेत.
मार्गात डिझेल भरण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही थांबे घेतले जाणार नाहीत. एसटीमधून २२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असेल. एखाद्या गावातील २२ प्रवाशांनी बसची मागणी केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येणार आहे.प्रवासामध्ये बस जेवणासाठी थांबविण्यात येणार नसून, प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोबत जेवण घेऊन यावयाचे आहे. नैसर्गिक विधीसाठी फक्त दोन ठिकाणी बस थांबविण्यात येणार आहेत.
या प्रवासाकरिता केली जाणारी तिकीट आकारणी ही नेहमीच्या रातराणीच्या तिकीट दराप्रमाणे एकेरी फेरीचे तिकीट आकारणी असणार आहे. या व्यतिरिक्त आरक्षण करणाºया प्रतिनिधींनी नजीकच्या आगारात आरक्षण करावयाचे आहे.सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ३४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सावंतवाडी आगारातून ७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
त्यामध्ये सावंतवाडी-तळेरे मार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता, सावंतवाडी-तळेरेमार्गे मुंबई ४.३० वाजता, सावंतवाडी तळेरेमार्गे ठाणे ५ वाजता, दोडामार्ग तळेरेमार्गे बोरिवली ६ वाजता, बांदा-बोरिवली ४.३० वाजता, सावंतवाडी कापसीमार्गे निगडी ७ वाजता, दोडामार्ग बांदा कापशीमार्गे निगडी सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे.मालवण आगारातून ५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात मालवण सायनमार्गे बोरिवली सायंकाळी ४.३० वाजता, मालवण सायनमार्गे मुंबई ५ वाजता, मालवण बोरिवलीमार्गे विरार ३ वाजता, आचरा सायनमार्गे बोरिवली ५ वाजता तर मालवण फोंडामार्गे निगडी सायंकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे.कणकवली आगारातून ८ गाड्या सोडण्यात येतील. यात कणकवली सायनमार्गे बोरिवली ४.३०, कणकवली सायनमार्गे मुंबई ४ वाजता, कणकवली पनवेलमार्गे ठाणे ६ वाजता, खारेपाटण पनवेलमार्गे बोरिवली ५ वाजता, तळेरे पनवेलमार्गे बोरिवली ५ वाजता, वैभववाडी-बोरीवली ५.३०, वैभववाडी-मुंबई सायंकाळी ६ तर फोंडा पनवेलमार्गे बोरिवली ही गाडी सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे.देवगड आगारातून ५ गाड्या सोडण्यात येतील. त्यामध्ये देवगड तळेरेमार्गे बोरिवली ३.३०, जामसंडे -बोरिवली ५ वाजता, तळेबाजार- बोरिवली ५.३०, शिरगाव-बोरिवली ६ वाजता, देवगड तळेरेमार्गे कुर्ला नेहरूनगर ४ वाजता, देवगड गगनबावडामार्गे वल्लभनगर ही गाडी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार आहे . विजयदुर्ग तळेरेमार्गे बोरिवली ४ वाजता तर विजयदुर्ग तळेरेमार्गे मुंबई गाडी ३ वाजता सोडण्यात येईल.कुडाळ आगारातून ४ गाड्या सोडण्यात येतील. यात कुडाळ तळेरेमार्गे बोरिवली गाडी सायंकाळी ४ वाजता, कसाल बोरिवली ४.३०, सिंधुदुर्गनगरी बोरिवली ४.३०, कुडाळ फोंडामार्गे निगडी ही गाडी रात्री ८.३० वाजता सोडण्यात येणार आहे. वेंगुर्ला आगारातून वेंगुर्ला तळेरेमार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता व शिरोडा तळेरेमार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.परतीसाठी गाडीची मागणी केल्यास सुविधापरतीच्या वाहतुकीकरितादेखील एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गट आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट मुंबई, उपनगर, पुणे तसेच राज्यातील अन्य ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. एखाद्या गावातील २२ प्रवाशांनी कोकणात जाण्याकरिता व परत येण्याकरिता गाडीची मागणी केल्यास त्यांना तशी सुविधा पुरविण्यात येणार आहे.