दोडामार्ग : वझरे येथे सुरू असलेल्या दूरसंचारच्या मोबाईल टॉवरच्या कामावरून गावातीलच दोन गटात मतभेद निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला होता. एका गटाने आरोग्याच्या दृष्टीने टॉवर धोकादायक असल्याचे सांगत तो बांधू नये, अशी मागणी केली. तर दुसऱ्या गटाने गावच्या विकासाच्या दृष्टीने टॉवर गरजेचा असल्याची भूमिका मांडत त्याचे समर्थन केले. याबाबत दोन्ही गटांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.वझरे येथे दूरसंचारचा टॉवर मंजूर झाला आहे. त्यासाठीची जागा वझरे-काळकेकरवाडी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या टॉवरचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हा टॉवर उभारण्यावरून गावातच दोन गट निर्माण झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मोबाईल टॉवर लोकवस्तीत उभारणे चुकीचे आहे.
हा टॉवर मंजूर झाल्यानंतर त्याची जागा निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. टॉवरला आमचा विरोध नाही, तर तो लोकवस्तीत उभारू नये, अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका एका गटाची आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनावर सुदन काळकेकर, नकुल काळकेकर, गोकुळदास काळकेकर, सुंदर काळकेकर, सुरेश काळकेकर, अजित काळकेकर, सोमा काळकेकर, रमेश काळकेकर, मोहन काळकेकर, साईनाथ काळकेकर आदींसह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा आपत्ती ओढवल्यास संपर्क साधणे कठीण होत होते. साहजिकच त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत होता. मात्र आता टॉवर झाल्यास ही गैरसोय दूर होणार आहे.
शिवाय विकासाचे दालनही वझरे गावासाठी खुले होईल, अशी भूमिका सुधीर शिरोडकर, समीर म्हावसकर, प्रेमनाथ विर्डीकर, संजय गवस, नारायण गवस, सुशांत गवस, अजित गवस, शरद शिरोडकर, विनायक खरपालकर, अनंत कुडचिरकर, निखिल गुरव, गुरूप्रसाद दामले, शाम घाडी, अमोघ भावे, समीर पर्येकर आदींनी मांडली आहे.वझरेत तणावपूर्ण शांततामोबाईल टॉवरच्या बांधकामावरून गावात मतभेद निर्माण होऊन दोन परस्पर विरोधी गट पडल्याने वझरे गावात तणावपूर्ण शांतता होती. अशा तणावाच्या वातावरणातच टॉवरचे काम सुरू होते.