सिंधुदुर्ग : पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र व फिडर बंद करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी बंद होतो. त्यामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होण्याच्या तक्रारी वाढतात. अशा स्थितीत संभाव्य धोका किंवा अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.
पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण पूर्णपणे प्रयत्नशील असून अतिवृष्टी व आपत्कालीन काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या काळजीबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागीय कार्यालय कुडाळ व विभागीय कार्यालय कणकवली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेले आहेत. सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाअंतर्गत कुडाळ येथे जिल्हा सनियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे.शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉलसेंटरचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे विजेच्या पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे, मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. समुद्र किनारा, डोंगराळ भाग याठिकाणी सर्रास असे प्रकार घडतात. पावसाळ्यात डीपी जळणे, खांबावरील पीन इन्स्युलेटर किंवा डिक्स इन्स्युलेटर पंक्चर होणे, जम्पर तुटणे, खांब उघडणे किंवा झाड पडून वाहिन्या तुटणे आदी सर्व प्रकारांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. वीजपुरवठा ठप्प झाल्यानंतर पहिल्यांदा महावितरणचा दूरध्वनी खणखणतो आणि जनमित्रांची फौज दोष शोधण्यासाठी बाहेर पडते.वादळी वारा असो अथवा पूर अशावेळी जनमित्रांच्या पथकाचे काम वाढते. टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. पावसाळा आला की, जनमित्रांचे पथक अधिक सजग होते. महावितरणकडून विजेचे खांब, वाहिन्या, पीन इन्स्युलेटर, डिक्स इन्स्युलेटर, डीपीमध्ये घालण्यात येणारे आॅईल आदी साहित्याचा स्टॉक करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नही केला जातो.पावसाळ्यात वीज ग्राहकांनी खालील काळजी घ्यावी
- पावसाळा कालावधीत वीजपुरवठा तक्रारीसंबंधी व इतर संभाव्य धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षास त्वरित संपर्क साधावा. ४झाडे पडल्याने विजेचे खांब मोडणे व परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार वाढतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध रहावे.
- या तारांना हात लावण्याचा किंवा त्यांना हटविण्याचा प्रयत्न करू नये. त्यासाठी महावितरण कंपनीशी संपर्क साधावा.
- झाडे तोडताना त्यांच्याजवळ अथवा सान्निध्यात विजेच्या तारा येत नाहीत ना याची खात्री करावी. अशा तारा असतील तर त्यातील वीजप्रवाह महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाºयांना विनंती करून बंद करून सुरक्षित स्थितीत मग अशा फांद्या तोडाव्यात.
- घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा.
- घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना यांना वीजतारांपासून दूर ठेवावे.
- विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
- घरात बसविलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली झाल्यास त्वरित महावितरण कंपनीशी संपर्क साधावा.
- ग्राहकांनी कोणत्याही विद्युत खांबांना, तारांना, वाहिनींना व अन्य उपकरणांना स्पर्श करू नये.
- विद्युत खांबांना व उपकरणांना जनावरे बांधू नयेत. विद्युत खांबांना दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
वीजपुरवठ्यास विलंब, ग्राहकांचा रोषवीजपुरवठा खंडित झाला की, ग्राहक संतप्त होतात. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु, अंधारात नेमका दोष शोधावा लागतो. बहुधा दऱ्यातून, डोंगरातून वीजवाहिन्या आलेल्या असल्यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी जाणाऱ्या जनमित्रांना विषारी प्राण्यांचाही सामना करावा लागतो. दोष सापडल्यास तो दूर करण्याचा तातडीने प्रयत्न केला जातो. मात्र तो दुरूस्त होण्यासाठी अवधी असेल तर शक्य तेथून पर्यायी वीजपुरवठा देण्यात येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या कुडाळ व कणकवली विभागात पावसाळ््यापूर्वी बहुतांशी ठिकाणच्या लाईनची देखभाल व दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही जिल्ह्याची एकंदरीतच भौगोलिक रचना व घनदाट झाडांची नैसर्गिकता लक्षात घेता पावसाळ््यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी पूर्ण क्षमतेने सतत प्रयत्नशील असणार आहेत.- चंद्रशेखर पाटील, अधीक्षक अभियंता