मालवण : आचरा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीने शिवसेना-भाजप पुरस्कृत आघाडीचा एकतर्फी धुव्वा उडवित आठ जागांवर जोरदार मुसंडी मारली. शिवसेना पुरस्कृत आघाडीला तीन तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळविला.
जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीत ग्रामविकासची प्रणया मंगेश टेमकर हिने शिवसेना पुरस्कृत ललिता पांगे यांचा ८३१ मतांनी दारुण पराभव केला. आचरा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आचरेवासीयांनी मालवण तहसील कार्यालय परिसरात घोषणा देत एकच जल्लोष केला.मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालवण तहसील कार्यालय येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता तहसीलदर समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.मतमोजणीप्रसंगी आचरा पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरपंच पदासह १३ सदस्य जागांसाठी ही निवडणूक पार पडली. सरपंचपदाची दुरंगी लढत तर १३ जागांसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.यात दहा जागांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी मंगेश टेमकर (ग्रामविकास आघाडी), मुजफर मुजावर (अपक्ष), पांडुरंग वायंगणकर (ग्रामविकास), दिव्या आचरेकर (शिवसेना), योगेश गावकर (शिवसेना), अनुष्का गावकर (शिवसेना), लवू घाडी (ग्रामविकास), वैशाली कदम (ग्रामविकास), श्रद्धा नलावडे (ग्रामविकास) व वृषाली आचरेकर (ग्रामविकास) यांना एकतर्फी कौल दिला. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी दोन्ही अपक्ष उमेदवार ग्रामविकास आघाडीसोबत असल्याचे चित्र होते.मालवण तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत निवडणूक असल्याने आचरा गावाची निवडणूक राजकीय पक्षांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्यासह माजी खासदार निलेश राणे यांनी आचरा गावात ठाण मांडून निवडणुकीला महत्त्व प्राप्त करून दिले होते. आचरा ग्रामविकास आघाडीला स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला होता.शिवसेना-भाजप पुरस्कृत आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीत गावविकास आघाडीने एकहाती वर्चस्व सिद्ध केल्यानंतर स्वाभिमानचे दत्ता सामंत, अशोक सावंत, नीलिमा सावंत, मंदार केणी, बाबा परब, शशांक मिराशी, संतोष कोदे, रवी गुरव, जेरॉन फर्नांडीस, शेखर मोरवेकर, अशोक बागवे, वामन आचरेकर, गुरु आचरेकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत जल्लोष केला.सरपंचपदी प्रणया टेमकरथेट सरपंच निवडणुकीसाठी आचरेत दुरंगी लढत झाली. ग्रामविकास आघाडीची प्रणया टेमकर आणि शिवसेना पुरस्कृत ललिता पांगे यांच्यात ही लढत झाली. दोघांमधील लढत ह्यकाँटे की टक्करह्ण अशी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रणया टेमकर ही आघाडीवर राहिली.
प्रणयाने १७३१ मते मिळवित ललिता पांगे यांचा ८३१ मतांनी पराभव केला. तर प्रणयाचे वडील माजी सरपंच मंगेश टेमकर यांनीही प्रभाग पाचमधून सदस्यपदाची निवडणूक लढवताना सुनील खरात व चंद्रशेखर भोसले यांचा दारूण पराभव करीत १३३ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे आचरे गावाचा गाडा कन्या हाकणार असून त्यांना त्यांच्या वडिलांची साथ लाभणार आहे. प्रणया विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आचरेवासीयांनी एकच जल्लोष केला.
विजयी उमेदवारांची नावे
- प्रभाग १ - (हिर्लेवाडी, शंकरवाडी) : पांडुरंग वायंगणकर (२०० मते, ग्रामविकास आघाडी), रेश्मा कांबळी (१६६ मते, ग्रामविकास).
- प्रभाग २ - (पिरावाडी, जामडूलवाडी) : मुजफर मुजावर (२६५ मते, अपक्ष), दिव्या आचरेकर (२११ मते, शिवसेना).
- प्रभाग ३ - (गाऊडवाडी, डोंगरेवाडी) : योगेश गावकर (२९९ मते, शिवसेना), अनुष्का गावकर (३०६ मते, शिवसेना), राजेश पडवळ (१६१ मते, अपक्ष).
- प्रभाग ४ - (पारवाडी, देऊळवाडी) : लवू घाडी (२९२ मते, ग्रामविकास), श्रद्धा नलावडे (३१९ मते, ग्रामविकास), वैशाली कदम (१६१ मते, ग्रामविकास).
- प्रभाग ५ - (वरचीवाडी, भंडारवाडी) : मंगेश टेमकर (४१४ मते, ग्रामविकास), वृषाली आचरेकर (५८६ मते, ग्रामविकास), ममता मिराशी (५४३ मते, ग्रामविकास).
आचरा ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रणया टेमकर हिला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामविकास आघाडी व अपक्ष उमेदवार उपस्थित होते.