सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरातील भूमिगत वीजवाहिन्या घालताना येणारा खर्च देण्याची तयारी वीज कंपनीने दर्शविली आहे. यात एक किलोमीटरमागे पंचवीस लाख रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे आता शहरातील काम करण्यास आमची कोणतीही हरकत असणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे दिली.सावंतवाडी पालिकेच्या सभेत याबाबत आवश्यक असलेला सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष साळगावकर बोलत होते. ते म्हणाले, शहरात तब्बल ३२ किलोमीटर परिसरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याची योजना आहे. ही योजना खूप चांगली आहे.
केवळ फक्त योजनेसाठी अकरा कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र त्यासाठी रस्ते खोदावे लागणार होते. तसे झाल्यास त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार होता.या सर्व बाबी लक्षात घेता मीटर मागे चार हजार रुपये खर्च येणार होता.मात्र तो पालिकेला परवडणारा नसल्यामुळे पालिकेने या योजनेला विरोध दर्शविला होता. मात्र आता वीज कंपनीने खोदाईसाठी लागणारा खर्च देण्याची मान्यता दर्शविली आहे.
यात प्रत्येक किलोमीटर मागे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.त्यामुळे तब्बल ३२ किलोमीटरसाठी अकरा कोटी रुपये लागणार आहेत. येणाऱ्या काळात जसे पैसे उपलब्ध होतील तसे काम करण्याची परवानगी, कंपनीला देण्यात येणार आहे.