कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत अधीक्षक अभियंता यांना घेराओ घातला. मात्र, अधीक्षक अभियंता पाटील यांनी घेराओकडे लक्ष न देता आपले भ्रमणध्वनीवरील बोलणे सुरूच ठेवले.
या कार्यकर्त्यांचे काहीही ऐकण्याची मनस्थिती त्यांनी दाखविली नाही. अखेर आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन मांडत आहोत. जर तुम्हाला लक्ष द्यायचा नसेल, तर तसेच सांगा, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी समस्या ऐकून घेऊन कार्यकर्त्यांचे समाधान केले.कुडाळ तालुक्यात विजेचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर मनसेने काही दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता पाटील यांना निवेदन सादर केले होते. हे प्रश्न चार दिवसांत मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे, दीपक गावडे, जगन्नाथ गावडे, चेतन राऊळ, प्रथमेश धुरी, अमर अणसूरकर, कुणाल किनळेकर, बाळा पावसकर, सिध्देश गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.बाव येथील मयेकर या शेतकऱ्याला मंजूर झालेल्या कृषीपंपाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याबाबत विचारणा केली असता काम आजपासूनच सुरू झाल्याचे सांगितले. तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत कुडाळसाठी वेगळे स्टेशन मागितल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.