सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ अंतर्गत राज्यातील अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्यातंर्गत योजनेमध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्हा परिषदांचे नामांकन झाले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समिती जिल्ह्यात दाखल झाली असून ही समिती जिल्ह्यात दोन दिवस राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेबरोबरच मालवण आणि कुडाळ पंचायत समित्यांचेही नामांकन झाले आहे. यशवंत पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्ष राज्यात तृतीय क्रमांक राखला आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानात देशात अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर दीनदयाळ पंचायत राज सक्षमीकरण अभियानातही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपले आवाहन कायम ठेवले आहे. गेली दोन वर्ष सतत यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात तीन नंबर राखला आहे. तर याहीवर्षी या अभियानात जिल्हा परिषदेचे नामांकन झाले असून यावेळी राज्यात प्रथम येण्यासाठीची तयारी या जिल्हा परिषदेने केली आहे.यशवंत अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पुरस्कासाठी नामांकन प्रस्ताव पुष्ठ्यर्थ पुरावे तपासणीसाठी सिंधुदुर्गात पाच सदस्यीय कमिटी दाखल झाली असून यात कोकण विभागीय उपायुक्त (आस्थापना), सहाय्यक आयुक्त (चौकशी) माणिकराव दिवे, लेखा संचालक रवींद्र खेडकर, प्रशिक्षण केंद्र्र, गारगोटीचे प्राध्यापक डॉ. सूर्यवंशी, सहाय्यक संचालक आदिवासी विभाग चौगुले यांचा समावेश आहे.या समितीने शुुक्रवारी सकाळी मालवण पंचायत समितीची तपासणी केली. त्यानंतर दुपारपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी सुरु केली असून शनिवारी ही समिती कुडाळ पंचायत समितीची तपासणी करणार आहे.तपासणीत जिल्हा परिषदेत तसेच दोनही पंचायत समित्यांच्या सभा कामकाज, अनुसूचित जाती जमाती संदर्भातील कामकाज, महिला सदस्यांचा सभांमधील सहभाग, गणपुर्ततेविना तहकूब होणाऱ्या सभा, अंदाजपत्रक, अभिलेख योग्यप्रकारे जतन केले जातात का, गट क, व गट ड, ची भरतीप्रक्रिया, सेवाजेष्ठता याद्या, अनधिकृत रित्या गैरहजर कर्मचारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषदेने केलेले नियोजन आदी बाबींची तपासणी हे पथक करणार आहे.